Tuesday, September 29, 2026
Homeराजकीयराज ठाकरे अन् राहुल गांधींमध्ये गुफ्तगू? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले...

राज ठाकरे अन् राहुल गांधींमध्ये गुफ्तगू? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कधी काय घडेल याचा नेम उरलेला नाही. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील राजकीय अंतर सर्वांना माहीत असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी टाकलेल्या एका राजकीय ‘बॉम्ब’मुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात संवाद सुरू आहे; आणि विरोधी पक्षांच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये संवाद का असू नये?” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या विधानामुळे मनसे आगामी काळात ‘इंडिया’ आघाडीच्या जवळ येणार का, अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना ‘राज ठाकरेंना इंडिया आघाडीत घेणार का?’ असा थेट सवाल विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, “राज ठाकरे हे सध्या देशात विरोधकांचा बुलंद आवाज बनून काम करत आहेत. आज सर्व विरोधी पक्ष एकमेकांशी सातत्याने संवाद साधत आहेत. राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यातील संवाद हा त्याचाच एक भाग आहे. आजचे आंदोलन हे राहुल गांधींनी सुरू केलेल्या संघर्षाचाच एक टप्पा आहे. कालपर्यंत ममता बॅनर्जी या आंदोलनात नव्हत्या, पण त्याही आता बैठकीला येत आहेत. राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत भविष्यात कधीतरी स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते.” आजच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचा अजेंडा निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबत सेट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या “आम्ही कुठेही जाणार नाही” या भूमिकेचे समर्थन करत राऊत म्हणाले, “शरद पवार कुठेही जाणार नाहीत, ते केंद्रात ‘इंडिया’ आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीचे भक्कम स्तंभ (पिलर) आहेत. त्यांच्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे काल्पनिक आहेत. सहकार, बँकिंग किंवा कौटुंबिक पातळीवर चर्चा होत असतात, परंतु त्यात राजकारण आणण्याची गरज नाही. पवारांचा मूळ पक्ष ‘मविआ’सोबतच ठाम राहील.”

यावेळी राऊत यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला. “तटकरेंचा पक्ष हा अजित पवारांचा राहिलेला नसून तो अमित शाह यांचा पक्ष झाला आहे. भविष्यात अमित शाह दिल्लीत सत्तेवर राहिले नाहीत, तर तटकरेंच्या पक्षाचे काय भवितव्य असेल? यासाठी तटकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाजवळ चिंतन बैठक घेतली पाहिजे,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. राऊतांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच पक्षांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

ताज्या बातम्या