Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रएका बाजूला कायद्याचे राज्य म्हणायचे, आणि…; बदलापूर घटनेवरुन राज ठाकरेंचा सरकारला संतप्त...

एका बाजूला कायद्याचे राज्य म्हणायचे, आणि…; बदलापूर घटनेवरुन राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

मुंबई | Mumbai
बदलापूरामधील एका नामांकित शाळेतील ४ ते ५ वर्षीय चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यावरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बदलापूरकरांनी रेल्वे स्थानकावर गेल्या पात तासांपासून उग्र आंदोलन छेडल आहे. जोपर्यंत त्या नराधमाला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केला. दरम्यान या आंदोलनावर आणि प्रकरणावर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

बदलापूरात स्थानिकांनी रेलरोको केला, स्थानिकांचा उद्रेक पाहता पोलीस खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणात शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना ही सेवेतून कमी करण्यात आले आहे. या प्रकरणावर राज ठाकरे यांनी ट्वीट करत आपला रोष व्यक्त केला आहे आणि याबाबत मनसे कार्यकर्त्यांना लक्ष देण्यासाठी सांगितले आहे.

राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचे राज्य म्हणायचे, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?” असा सवाल विचारत राज यांनी प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या,” असे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे.

काय आहे प्रकरण?
बदलापूर पूर्व भागातील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या २ चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी गेल्या असताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर अत्याचार केले होते. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस ही घटना घडली होती. पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नव्हते. त्यामुळे तिच्या आजोबांनी तिला डॉक्टरकडे नेवून वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले. यातून दुसऱ्या मुलीवरही अत्याचार झाल्याचे उघड झाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या