सोलापूर | Solapur
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून राज ठाकरे हे स्वतः महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चौफेर फटकेबाजी केली, त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जातीवरून महाराष्ट्रात विष कालवले जात आहे, आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मतांचे राजकारण आहे,’ असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे नेमके काय म्हंटले?
राज्यात सध्या सुरू असलेल्या ओबीसी- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. “राज्यात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. मराठा ओबीसी वाद हे मताचे राजकारण आहे. लहान लहान मुळे आरक्षणामुळे आमची मैत्री तुटली असे सांगतात, हे चित्र भीषण आहे, महाराष्ट्रात असे चित्र कधीच नव्हते,” असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
‘जातीवरून महाराष्ट्रात विष कालवले जात आहे, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मतांचे राजकारण आहे. महाराष्ट्रात असे वातावरण कधी नव्हते, जातीपातीचे राजकारण करणाऱ्याला दूर ठेवले पाहिजे. जातीवरून माथी भडकवण्याचा प्रयत्न आहे. राज्याचे मणिपूर होऊ नये, खासगी क्षेत्रात कुठे आहे आरक्षण? नोकरी, शिक्षणात जातीचा प्रश्न येतो कुठे? महाराष्ट्रात बाहेरच्यांना नोकऱ्या मिळतात आपले तसेच राहातात,’ असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
शरद पवारांना टोला
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती होण्याची भिती व्यक्त केली होती. यावरुनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात हातभार लावू नये, महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये म्हणून काळजी घ्यावी असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान पुढे बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे, ‘सगळे गुजरातलाच नेऊन कसे चालेल असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर लाडकी बहीण, लाडका भाऊ यापेक्षा लाडका मतदार करा’ असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावला आहे. मनसे यावेळी विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा