Monday, November 25, 2024
Homeमनोरंजन“...ह्या दोन्हींबद्दल दीदी अनभिज्ञ आणि अलिप्त राहिल्या”; राज ठाकरेंची भावूक पोस्ट

“…ह्या दोन्हींबद्दल दीदी अनभिज्ञ आणि अलिप्त राहिल्या”; राज ठाकरेंची भावूक पोस्ट

मुंबई | Mumbai

आपल्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सूर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Birth Anniversary) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांना आदरांजली वाहत आहे. लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी भावुक होऊन एका निवेदनातून लता दीदींबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं,

“लतादीदींची आज जयंती. आपल्याला वाढदिवसाच्या मिळणाऱ्या शुभेच्छांचा आनंद असतोच, पण आपल्याला एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात पण विशेष आनंद असतो, त्या व्यक्तींमध्ये दीदी होत्या. त्यांना थेट शुभेच्छा देण्याचा आनंद मला दोन दशकांहून अधिक काळ मिळाला, हे माझं भाग्यच.

दीदी गेल्यापासून मी त्यांच्याबद्दल फारसं कुठेच बोललो नाही, सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही. दीदींच्या निधनानंतर एक रितेपण जाणवायला लागलं, आणि ह्या रितेपणाच्या तीव्रतेचा अंदाज येण्यातच मधले काही महिने निघून गेले.

दीदीबद्दल काही लिहायचं ठरवलं तर, त्यांच्या गाण्याबद्दल लिहिणं शक्यच नाही, ते इतकं अत्युच्च आहे की कितीही त्याला शब्दांत पकडायचं ठरवलं तरी हातातून काहीतरी निसटतच राहतंय असं वाटत राहणार.

पण त्यांचं गाणं जसं दैवी होतं, तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक दैवी अंश होता आणि ज्याची भुरळ मला त्यांना पहिल्यांदा भेटलो तेंव्हा पडली आणि ती कायम राहिली आणि पुढेही राहील. हल्ली ‘ब्रँड’ हा शब्द प्रचलित आहे, किंवा राजकीय,सामाजिक जीवनात ‘करिष्मा’ हा शब्द वापरतात, हे निर्माण करण्यासाठी प्रचंड अट्टाहास केला जातो.

अशा अट्टाहासातून, ‘ब्रँड’, ‘करिष्मा’ काहीकाळ निर्माण होतो पण तो ओसरतो, निसटून जातो. पण दीदींच्या बाबतीत ते नैसर्गिकपणे आणि सहज घडत गेलं आणि आणि ती घडण्याची प्रक्रिया आणि त्याचं अंतिम टोक ह्या दोन्हींबद्दल दीदी अनभिज्ञ आणि अलिप्त राहिल्या, हे दुर्मिळ आहे.

आयुष्यात फक्त आणि फक्त गाणं ह्या एका गोष्टीवर कमालीचं प्रेम करत, ते आत खोल रुजवत पुढे ते लोकांसमोर ठेवायचं. ते गाणं वरवर सोपं वाटावं पण ते तितकंच कोणालाच पूर्ण गवसू नये इतकं मोठं, अशी साधना केल्यावर जी शांतता, सहजता दीदींच्या वागण्यात आली होती, तिचं वर्णन करायला ऋषितुल्य हाच शब्द मलातरी सुचतोय.

हे असलं सगळं दैवी असतं, ते कधीतरी एकदाच येतं. हे भव्य आणि तरीही अमूर्त वाटणारं ‘दर्शन’ मला अनेकदा जवळून होऊन गेलं. आयुष्यात सर्वोच्च काय असतं हे पाहणं आणि ते अनुभवणं हे भाग्य मला लाभलं हाच माझ्या आयुष्यातील खूप मोठा आनंद.

दीदी जिथे असतील तिथे त्यांना माझा नमस्कार.

राज ठाकरे”

१९२९ मध्ये जन्मलेल्या लता मंगेशकर यांचे या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ‘परिचय’, ‘कोरा कागज’ आणि ‘लेकिन’साठी त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देशातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या