मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत आणि अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली असून त्याचा दुसरा भाग शुक्रवारी प्रदर्शित झाला. या मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका केली. तसेच, वाढवण बंदराजवळ होणार्या विमानतळाविषयी भाष्य केले आहे. यावेळी, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे मोठे कारस्थान सुरु असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
संजय राऊत यांनी प्रश्न विचारताना मुंबईतील संपत्ती व जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. “मुंबईची सपूर्ण लक्ष्मी मराठी माणसाच्या हातात नाही. मराठी माणूस कामगार, श्रमिक, लढवय्या होता. तो आता बाहेर गेलाय. त्याची सगळी संपत्ती एका विशिष्ट वर्गाच्या हातात आहे. ती सातत्याने गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होतोय. याचा अर्थ मुंबईत जमिनीचा तुकडा फक्त तुमच्याकडे राहील आणि संपत्ती गुजरातकडे जाईल”, असे संजय राऊत म्हणाले.
Nashik News: कुंभ पर्वातील अमृत वचननामा म्हणजे लोकाभिमुख धोरण – सुनील केदार
राज ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्राचा भाग गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा राज ठाकरे यांनी एक उदाहरण देऊन केला. “मुंबईनंतर नवी मुंबईत जे विमानतळ झाले आहे. मुंबईमधील हक्काच्या विमानतळावरील सगळा कार्गो तिथे नवी मुंबईतील विमानतळावर हलवणार आहेत. आता सुरुवात झाली असून हळूहळू मुंबईतील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईमध्ये हलवणार आहेत. आताचा मुंबईतील विमानतळ हे अदानीकडे आहे. आताच्या विमानतळाचे क्षेत्रफळ बघितला तर कमीत कमी ५० शिवाजी पार्क मैदाने बसतील इतके मोठे आहे. म्हणजे उद्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला हलवायचे आणि इथल्या विमानतळाचा सर्व भाग विकायाला काढायचा प्लॅन त्यांचा आहे,” असा आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला.
अंबानी अदाणींमधला फरक राज ठाकरेंनी सांगितला
दरम्यान, आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ राज ठाकरेंनी देशातील दोन प्रमुख उद्योगपती घराणी अर्थात अदानी व अंबानी यांच्यातील फरक सांगितला. “हे सगळं मोदी-शाहा राज्यकर्ते झाल्यानंतरच झालेय. अदानी आणि अंबानी यांच्यातला फरक आहे. यांचे व्यवसाय करत असताना चोऱ्यामाऱ्या तर सगळेच करत असतात. पण अदानी व अंबानी यांच्यातला महत्त्वाचा फरक बघायचा तर मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते. पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झाला आहे. अदानीचा विस्तार मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरच अदानींना मुंद्रा पोर्ट मिळाला आहे. मग पंतप्रधान झाल्यानंतर तर अदानींना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत”, असे राज ठाकरे म्हणाले.
“मला भाजपाला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा तिथे भाजपाचे सरकार नसून काँग्रेस किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचे सरकार आहे. केंद्रातल्या एखाद्या सरकारने जर एकाच उद्योगपतीवर मेहेरबानी केली असती तर भाजपाची त्यावर काय प्रतिक्रिया असती?” असा थेट सवाल राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपाला केला आहे.




