मुंबई । Mumbai
महाराष्ट्रातील भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शिरूरमधील ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्यानंतर फरार झालेल्या सतीश भोसलेचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यात त्याचे पैसे, दादागिरी आणि आलिशान जीवनशैलीचे खुले प्रदर्शन दिसून आले. अटक केल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चौफेर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत पार पडलेल्या मनसे पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंनी “एक खोक्याभाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभाच खोक्याभाईंनी भरली आहे” अशा शब्दांत घणाघाती टीका केली. ते पुढे म्हणाले, “मुळ मुद्दे बाजूला ठेवले जातात आणि राजकीय चर्चा भलत्याच दिशेने वळवल्या जातात.”
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेने संघटनात्मक पावलं उचलली आहेत. मुंबईसाठी प्रथमच शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबई शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली असून अमित ठाकरे यांच्यावर शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज ठाकरे म्हणाले, “मुंबईतील नव्या पदरचना आम्ही केल्या आहेत. २ एप्रिल रोजी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कामाचे चौकट स्पष्टपणे लेखी स्वरूपात दिलं जाईल.” राजकीय वर्तुळात सध्या खोक्या भाई प्रकरण आणि राज ठाकरे यांच्या टीकेमुळे चर्चेला नवे वळण मिळाले आहे.