Saturday, May 2, 2026
HomeराजकीयRaj Thackeray : "आज तुम्ही जे पेरताय तेच उद्या तुम्हाला दामदुपटीने…", राज...

Raj Thackeray : “आज तुम्ही जे पेरताय तेच उद्या तुम्हाला दामदुपटीने…”, राज ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही, आज तुम्ही जे पेरताय तेच उद्या तुम्हाला दामदुपटीने सोसावे लागेल,” अशा कडक शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. दादर येथील शिवसेना भवनात महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी यावेळी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा बिनविरोध झाल्या होत्या, तेव्हा भाजपने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. “बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका चालत नाहीत, मग महाराष्ट्रात तुम्ही जे राजकारण करत आहात त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तेच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रकार थांबवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, “राजकारणात येणाऱ्या नवीन पिढीची विचारसरणी बदलणे हे अत्यंत घातक आहे. तुम्ही आज चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले, तर भविष्यात तुमच्या वाट्याला काय येईल याचा विचार करा. काँग्रेसने असे केले म्हणून आम्हीही तसेच करू, ही वृत्ती राज्याला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे.” महाराष्ट्राचे राजकारण उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दिशेने जात असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे राज ठाकरे यांनी तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात ठेवलेले पाऊल. याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, “२० वर्षांनंतर इथे आल्यावर मला एखाद्या तुरुंगातून सुटका झाल्यासारखे वाटत आहे. मी नवीन शिवसेना भवन पहिल्यांदाच पाहत आहे, कारण माझ्या मनातील आठवणी जुन्या वास्तूशी जोडलेल्या आहेत. १९७७ मध्ये शिवसेना भवन बांधले गेले आणि त्याच काळात जनता पक्षाच्या विजयानंतर इथे झालेली दगडफेक मी जवळून पाहिली आहे.”

राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. “सत्ता आज आहे उद्या नाही, पण आपण कोणते पायंडे पाडतोय हे महत्त्वाचे आहे. जेव्हा दुसरे सत्तेत येतील आणि ते तुमच्याशी याहून वाईट वागतील, तेव्हा तक्रार करण्याची जागा उरणार नाही,” असे सूचक विधान त्यांनी केले. शिवसेना भवनातील या पत्रकार परिषदेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...