Wednesday, September 18, 2024
HomeराजकीयSitaram yechury : अन् 'ते' येचुरींच्या बाबतीत घडलं; सीताराम येचुरींना श्रद्धांजली वाहताना...

Sitaram yechury : अन् ‘ते’ येचुरींच्या बाबतीत घडलं; सीताराम येचुरींना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरेंनी काय म्हंटल?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (माकप) नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. येचुरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. सीताराम येचुरी ७२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ते एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शनने त्रस्त होते. त्यांना १९ ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतर देशभरातील विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही येचुरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन झालं. येचुरी यांचा किंवा एकूणच कम्युनिस्ट पक्षाचा माझा तसा कधी सहवास आलेला नाही, पण एक विचारसरणी एकदा का स्वीकारली की तिच्याशी कुठलीही प्रतारणा न करता, शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर श्रद्धा ठेवणारे भारतीय राजकारणात आता फक्त कम्युनिस्टच उरलेत असं म्हणावं लागेल, आणि याचंच मला खूप कौतुक आहे.

हे ही वाचा : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेसच्या नेत्याने थेट आकडाच…

सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातले तसे बऱ्यापैकी प्रगतिशील विचारांचे नेते. कम्युनिस्टांचा काँग्रेस विरोध कडवा. पण किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी कम्युनिस्टांच मन वळवण्यात सीताराम येचुरी यांचा वाटा मोठा.

‘सत्ता’ हाच किमान समान कार्यक्रम झालेला असताना, सैद्धांतिक विरोध बाजूला ठेवून, काही मूलभूत प्रश्नांवर एकत्र येणे हे आता दुर्मिळच झालं आहे. एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या खासदाराची राज्यसभेची मुदत संपताना, सभागृहातील सदस्यांनी भावनिक निरोप देणे, हे येचुरींच्या बाबतीत घडलं.

विचारसरणीला घट्ट धरून राहण्याची परंपरा अस्तंगत होत असताना येचुरींसारख्या नेत्यांचं वेगळेपण जाणवत राहतं.

सीताराम येचुरींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली…

सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ ला मद्रास (चेन्नईत) एका तेलुगू भाषिक ब्राह्मण परिवारात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर त्यांच्या आई कल्पकम येचुरी एक सरकारी अधिकारी होत्या. सीताराम येचुरी यांनी नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तसेच त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या उच्च माध्यमिक परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच बीएचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर दिल्लीतील जेएनयू येथे एम.ए. अर्थशास्त्रचं शिक्षण घेतलं होतं.

हे ही वाचा : मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या…; पंतप्रधान मोदी – सरन्यायाधीशांच्या भेटीवरुन संजय…

आणीबाणीच्या काळात जेएनयूमधील अटक होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये येचुरी हे देखील होते. सीताराम येचुरी हे जेएनयूमध्ये शिक्षण घेत असताना राजकारणात सक्रिय झाले होते. ते जेएनयू विद्यार्थी संघाचे तीनवेळा अध्यक्ष बनले होते. येचुरी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रक वाचून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांचं ते आंदोलन चांगलंच गाजलं होतं. सीताराम येचुरी हे माजी सरचिटणीस हरकिशन सिंग सुरजीत यांच्या आघाडीला पुढे चालू ठेवण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी १९९६ मध्ये काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत संयुक्त आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. त्यांनी २००४ मध्ये यूपीए सरकारच्या स्थापनेदरम्यान आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या