नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले. राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशारा देत म्हटले की, “ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. हा फक्त ट्रेलर आहे. योग्य वेळ आल्यावर जगाला पूर्ण चित्रपट दाखवू.” संरक्षणमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाचे खूप कौतुक केले आहे.
‘लोकांना जितका वेळ नाश्ता करायला लागतो, तेवढ्या वेळात तुम्ही शत्रूचे काम तमाम केले’
भुज एअर बेसवर राजनाथ सिंह यांनी जवानांची भेट घेत ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, जेवढ्या वेळात लोक नाश्ता करतात तेवढ्या वेळात तुम्ही शत्रूचे काम तमाम केले. ऑपरेशन सिंदूरच्या काळात तुम्ही जे काही केले, त्याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे. मग ते भारतात असो की विदेशात. प्रत्येकाला तुमचा अभिमान आहे. पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी भारतीय हवाई दलाला फक्त २३ मिनिटे पूरे होते. जेवढ्या वेळात लोक नाश्ता करतात, तेवढाच वेळ तुम्ही घेतला आणि पाकला धडा शिकवला, असे राजनाथ सिंह म्हणाले.
मला खात्री आहे की तुम्ही भारताच्या सीमा सुरक्षित ठेवाल
पुढे बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘कालच मी श्रीनगरमध्ये आपल्या शूर लष्करी जवानांना भेटलो. आज मी येथे हवाई योद्ध्यांना भेटत आहे. काल मी उत्तर भागात आपल्या सैनिकांना भेटलो आणि आज मी देशाच्या पश्चिम भागात हवाई योद्धे आणि इतर सुरक्षा दलाच्या जवानांना भेटत आहे. दोन्ही आघाड्यांवर प्रचंड उत्साह आणि ऊर्जा पाहून मी उत्साहित आहे. मला खात्री आहे की तुम्ही भारताच्या सीमा सुरक्षित ठेवाल. यादरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी बशीर बद्र यांच्या एका ओळीतून पाकिस्तानला सल्लाही दिला. ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल के चलना क्योंकि तुम नशे में हो.’, या शायरीतून सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
#WATCH | Bhuj, Gujarat | Defence Minister Rajnath Singh says, "#OperationSindoor is not over yet. Whatever happened was just a trailer. When the right time comes, we will show the full picture to the world." pic.twitter.com/13BHeIZgkS
— ANI (@ANI) May 16, 2025
“पहलगाममध्ये त्यांनी धर्म विचारून मारले आणि आम्ही दहशतवाद्यांना, पाकिस्तानला त्यांचे कर्म पाहून अद्दल घडवली. मी जगाला विचारू इच्छितो की, अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शहीद झालेल्या आपल्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो” असे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी म्हटले.
तुम्ही पाकिस्तानातील टेरर इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रभावी कारवाई केली. पण आता उद्ध्वस्त झालेल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांना पुन्हा बनवण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पाकिस्तानी नागरिकांकडून घेण्यात आलेल्या टॅक्सचा वापर जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांसाठी करण्यात येत आहे. मसूद अजहर सारख्या खतरनाक अतिरेक्याला सुमारे 14 कोटी रुपये देण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने त्याला वैश्विक दहशतवादी घोषित केल्यानंतरही पाकिस्तान ही मदत करत आहे. त्यामुळे पाकिस्तानला दिलेल्या मदतीचा आयएमएफने पुनर्विचार करावा असं आवाहन त्यांनी केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा