नाशिक | प्रतिनिधी Nashik
सध्या देशभरात इंडियन प्रीमिअर लीगचा उत्साह रंगला असून, जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात राजस्थानचा संपूर्ण संघ गुलाबी रंगाच्या विशेष जर्सीत मैदानात उतरला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेला हा सामना राजस्थान रॉयल्सच्या तिसऱ्या वर्षाच्या पिंक प्रॉमिस मॅच उपक्रमाचे प्रतीक ठरला.
महिलांच्या नेतृत्वाखालील सामाजिक परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी राजस्थान रॉयल्स फाउंडेशनतर्फे हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, या सामन्यात संघाने परिधान केलेली जर्सी नाशिकच्या १९ वर्षीय समीक्षा रामेश्वर मुंदडा हिने डिझाइन केली होती.राजस्थान रॉयल्सने आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातून साडेआठ हजारांहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यातून समिक्षाच्या डिझाइनची निवड करण्यात आली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी ही जर्सी परिधान करून मैदानात सामना खेळला.
जर्सीची खास वैशिष्ट्ये
समिक्षाने मुंदडा हिने तयार केलेल्या जर्सीमध्ये पाण्याच्या लहरींसारखा ‘रिपल पॅटर्न’ वापरण्यात आला आहे. एका महिलेचे सक्षमीकरण कुटुंब आणि समाजात सकारात्मक बदलांच्या लाटा निर्माण करू शकते, हा संदेश या डिझाइनमधून देण्यात आला आहे. याशिवाय जर्सीमध्ये सूर्यापासून प्रेरित डिझाइन घटकांचा समावेश करण्यात आला असून, राजस्थान रॉयल्स फाउंडेशनच्या मदतीने सक्षम झालेल्या महिलांची नावेही त्यावर समाविष्ट करण्यात आली आहेत.
काय आहे पिंक प्रॉमिस ?
पिंक प्रॉमिस हा राजस्थान रॉयल्सचा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम असून, त्याचे नेतृत्व रॉयल राजस्थान फाउंडेशन करते. “औरत है तो भारत है” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. कौशल्य विकास, सौर ऊर्जा प्रशिक्षण, उपजीविकेच्या संधी आणि समुदाय नेतृत्वाच्या माध्यमातून ग्रामीण व तळागाळातील महिलांना सक्षम करण्याचे काम या उपक्रमातून केले जाते. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत सुमारे एक हजार घरांचे सौर विद्युतीकरण, शेततळी उभारणी आणि वृक्षारोपणाची कामे करण्यात आली असून लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
राजस्थान रॉयल्सचे सीईओ काय म्हणाले?
या उपक्रमाबाबत राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक चित्रे म्हणाले कि, गेल्या काही वर्षां पिंक प्रॉमिस ही प्रभावी सामाजिक चळवळ ठरली आहे. क्रिकेट हा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजाच्या भल्यासाठीही योगदान देऊ शकतो, हे या उपक्रमातून दिसून आले आहे. २०२४ मध्ये या मोहिमेद्वारे २६० घरांना वीजपुरवठा करण्यात मदत झाली, तर २०२५ मध्ये ५२० हून अधिक घरांना याचा लाभ मिळाला. आता हा सकारात्मक प्रभाव अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यंदाही राजस्थान रॉयल्सकडून सौर विद्युतीकरण मोहिमेला चालना देण्यात येणार आहे. सामन्यादरम्यान संघाकडून मारल्या जाणाऱ्या प्रत्येक षटकारामागे सहा घरांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.





