Monday, June 24, 2024
Homeनगरविखेंच्या त्रासाला कंटाळून अनेक भाजप नेत्यांची लंकेंना मदत

विखेंच्या त्रासाला कंटाळून अनेक भाजप नेत्यांची लंकेंना मदत

फाळके यांचा गौप्यस्फोट || पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

अनेक भाजप नेत्यांनी विखे यांच्या त्रासाला कंटाळून निवडणुकीत निलेश लंके यांना मदत केली आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बुधवारी केला. पक्षशिस्त महत्वाची मानून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी जबाबदारी देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. तेव्हा पालकमंत्र्यांनीही अशी पक्षशिस्त व नैतिकता दाखवावी, असा सल्ला देताना अप्रत्यक्षपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी फाळके यांनी केली.

नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके निवडून आले आहेत. यानिमित्त महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांना बुंदीचे लाडू भरवले. यावेळी फाळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदी उपस्थित होते. फाळके म्हणाले, सामान्यांना त्रास देण्याचे काम पालकमंत्र्यांकडून झाले आहे. आम्ही अतिक्रमणांच्या विरोधातच आहोत. मात्र सुप्यासारखी अतिक्रमणे जिल्हाभरात आहेत, ती दिसत नाही. सुपे येथे खुनशी प्रवृत्तीने व सूडबुद्धीने कारवाई झाली.

सामान्यांना त्रास दिल्यावर त्यांच्यातून उद्रेक होतो, हे भाजपच्या काही जणांनी दाखवून दिले आहे व त्यांनी लंके यांना साथ दिली आहे, असा दावा करून फाळके म्हणाले, आम्ही विजयाने हुरळून जाणार नाही, पण त्यांना पराभव पचवता येईल की नाही हा प्रश्न आहे. यापुढे त्यांनी सामान्यांना त्रास देऊ नये. ते कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार महाविकास आघाडीचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना आहे व ते त्यावर भाष्य करतील, पण फडणवीस यांच्यासारखी शिस्त व नैतिकता पालकमंत्री दाखवतील का असा माझा त्यांना सवाल आहे, असेही फाळके म्हणाले.

दरम्यान, तुतारीशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह मिळालेल्या उमेदवाराला 44 हजार 500 मते मिळाली आहेत. 17 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने दोन ईव्हीएम मशीन होते, पहिल्या ईव्हीएमच्या दुसर्‍या क्रमांकावर लंके यांचे नाव होते तर दुसर्‍या ईव्हीएमच्या दुसर्‍या क्रमांकावर तुतारी साधर्म्य असलेले चिन्ह असलेल्या उमेदवाराचे नाव होते. त्या उमेदवाराला कोणीही ओळखत नाही. त्यामुळे त्याला मिळालेल्या मतांपैकी किमान 40 हजार मते लंके यांची आहेत, असा दावाही फाळके यांनी केला.

कर्डिले पाठीशी, तो पडतो
शिवाजी कर्डिले ज्या खासदारांच्या मागे असतात, तो खासदार पडतो, असे भाकीत मी केले होते. ते खरे ठरले, असा दावा प्रा. शशिकांत गाडे यांनी केला. तसेच कर्डिले, कोतकर, जगताप यांच्या विरोधात मागच्यावेळी विखे निवडणूक लढले होते, त्यामुळे ते विजयी झाले. पण यंदा त्यांनी त्यांनाच बरोबर घेतल्याने त्यांचा पराभव झाला. मागच्यावेळी स्व. अनिल राठोड यांनी विखेंना साथ दिली, पण सहा महिन्यांनी त्यांनी राठोडांविरोधात काम केले. त्यामुळे त्यांना जनतेने उत्तर दिले आहे. लंकेंचा विजय हा अनिल राठोड यांना श्रध्दांजली आहे, अशी भावना प्रा. गाडे यांनी व्यक्त केली. येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा आघाडीच्या निवडून आणण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या