अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्ह्याने प्रशासकीय नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगातून राज्यस्तरीय गौरव प्राप्त केला आहे. 2023-24 च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन महत्त्वाचे पुरस्कार जाहीर झाले असून, अवैध गौण खनिज वाहतुकीस आळा घालण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेच्या (मशीन लर्निंग) वापराच्या अभिनव उपक्रमासाठी जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
राज्य सरकारकडून दिला जाणारा 10 लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अतिरिक्त जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना जाहीर झाला आहे. तसेच, 2024-25 साठी शासकीय अधिकार्यांच्या गटात देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले, तर शासकीय कर्मचार्यांच्या गटात राहाता येथील मंडल अधिकारी मोहसीन शेख यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात कृत्रिम बुध्दिमत्तेचा (मशीन लर्निंग) प्रभावी वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने महाखनिज प्रणाली विकसित करून वाहनांवर ई-पंचनामा केला जातो आणि दंडाची प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाईन करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गोल्ड स्कॉच पुरस्कारानेही जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले आहे. मंडल अधिकारी मोहसीन शेख यांच्या महसूलविषयक पुस्तकांच्या राज्यातील पहिल्या क्युआर कोड वाचनालय उपक्रमाला पुरस्कार मिळाला आहे. महसूलविषयक माहिती सामान्य नागरिकांना समजावी, यासाठी शेख यांनी सोप्या भाषेत पुस्तके लिहून घेतली. देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरालगतच्या 30 गावांसाठी सक्शन मशिनव्दारे मैला उपसा व गाळ व्यवस्थापन योजना राबविण्यात आली आहे. यासाठी पंचायत समिती राहुरी आणि 30 ग्रामपंचायती यांच्याशी करारनामा करण्यात आला असून, स्वच्छतादूत बचतगटांना प्रकल्प व्यवस्थापन देण्यात आले आहे.