Sunday, January 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : भाजप सिकंदर

राज-का-रण : भाजप सिकंदर

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाबाबत कमालीचे नकारात्मक वातावरण असते, यावेळेस भाजपचे काही खरे नाही, असे लोकही बोलत असतात तेव्हा तेव्हा भाजपला अभूतपूर्व यश मिळते, असे मत काही संपादकांशी चर्चा करतांना नुकतेच मांडले होते. तेव्हा सर्वच जण हसले होते. परंतु केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दुसर्‍या पर्वातच अशी चर्चा सुरु झाली होती. प्रत्यक्षात भाजपची केवळ सरशी झाली नाही तर नेहमीपेक्षा चांगले यश मिळाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच सत्तेवर येणार असे सगळ्यांनाच वाटायला लागले होते. प्रत्यक्षात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला न भूतो.. यश मिळाले. नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतही भाजप स्वबळावर सत्तेत येईल अशी कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एवढेच काय निकाल लागल्यानंतर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनाही क्षणभर नवल वाटले होते. आता पुन्हा या निवडणुकीतही वातावरण अत्यंत खराब असल्याचे बोलले गेले.

YouTube video player

भालेकर शाळेची इमारत पाडण्याचा विषय, तपोवनातील वृक्षतोड, दत्तक नाशिकची झालेली हेळसांड, वाहतूक कोंडीची भीषण समस्या, रस्त्यांची वाट लागलेली, पाणीपुरवठ्याचे प्रश्न अशा असंख्य विषयांमुळे भाजपची वाट यंदा बिकट असेल, असे वाटत होते. अशातच इतर पक्षांमधून आलेल्यांना अंथरलेल्या पायघड्या, त्याविरोधात पक्षातच झालेले धुमशान, स्थानिक आमदारांची नाराजी, एबी फॉर्म देतांना झालेला राडा आणि बंडखोरीची लाट या प्रासंगिक घटकांमुळे तर भाजपचे आता काही खरे नाही, अशीच चर्चा सुरु झाली. प्रत्यक्षात सर्वांचे अंदाज चुकवून भाजपने गेल्या खेपेपेक्षाही सहा जागा अधिक मिळवून दणदणीत यश मिळविले. म्हणूनच जेव्हा भाजपविषयी नाराजीची भावना व्यक्त होते किंवा भाजपविरोधात सगळेच बोलायला लागतात तेव्हा भाजप उसळून वर येतो हे लक्षात येते. बाऊन्स बॅक म्हणजेच उसळून वर येण्याची क्षमता ही भाजपच्या जणू डीएनएमध्ये असावी.

भाजपला जे काही यश मिळाले ते अपघाती तर निश्चितच नाही. एकतर भाजपची केडरबेस्ड यंत्रणा व पक्षाचे कार्यकर्ते व मतदारांना उमेदवारापेक्षाही पक्ष महत्त्वाचा वाटणे यामध्ये पक्षाच्या यशाचे सार आहे. भाजपमधील नव्या संकल्पना कदाचित पक्षाच्या मतदारांना योग्य वाटत नसतील तर ते त्याबद्दल खुलेपणाने बोलून राग शांत करीत असावेत. पण त्याचा परिणाम त्यांच्या मतांवर होत नाही, हे वारंवार दिसून येते. त्यामुळेच यावेळेस निवडून आलेल्या अनेक नावांकडे नजर टाकल्यास हे कसे निवडून येऊ शकतात, असेच कोणालाही वाटेल. पक्ष महत्त्वाचा, उमेदवार नाही, हे वाक्य त्यांच्या रक्तारक्तात भिनलेले असते. जेथे वारंवार प्रयत्न करुनही यश मिळत नाही, अशा ठिकाणी इतर पक्षातील मातब्बरांना गळाला लावायचे आणि पक्षाची रेषा मोठी करायची हा राजकारणातील अलिकडचा लवचिकपणा भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी केवळ आत्मसात केला असे नाही तर त्याचा कमाल वापर केला. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील, शाहू खैरे, विनायक पांडे अशा इतर पक्षातील मातब्बरांना पक्षात घेऊन भाजपने किमान वीस जागांची भर घातल्याचे लक्षात येते.

दिनकर पाटील, सुधाकर बडगुजर यांच्याविषयी बरेच लिहिता-बोलता येईल. पण त्यांची प्रभागातील ताकद व स्वतासह इतरांनाही निवडून आणण्याची क्षमता भाजपने जोखली. त्याचा अर्थातच फायदा झाला. नाही म्हणायला पक्षाचे काही ठोकताळे चुकले देखील. परंतु त्याचे प्रमाण नगण्य आहेत. पक्षातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींना कायद्याचा धाक दाखवून कारवाई करुन जनतेची सहानुभूती मिळविली. पण त्याच लोकांच्या वारसांना उमेदवारी देऊन त्यांच्या जनमानसातील प्रतिमा व प्रभावाचा फायदाही करुन घेतला. असे चीत भी मेरी व पट भी मेरी वागणे केवळ भाजपलाच जमू शकते. गिरीश महाजन यांनी ज्या पध्दतीचे राजकारण नाशिकमध्ये सुरु केले, त्याविरोधात पक्षातच नाराजी होती. किंबहुना जळगावच्या माणसाची नाशिकमध्ये एवढी लुडबूड कशाला, असेही पक्षाचेही लोक बोलू लागले होते.देवयानी फरांदे, सीमाताई हिरे व राहूल ढिकले या तीनही आमदारांनी महाजनांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल वेळोवेळी त्रागाही व्यक्त केला. पण महाजन यांना पक्षाने संपूर्ण पाठिंबा दिलेला होता.

महाजन यांचे ठोकताळे व गणित अधिक पक्के असल्याचे निकालातून दिसले. महाजन तळ ठोकून राहिले. जेथे गडबड वाटली तेथे धावून गेले. समस्या निवारण केली. वेळप्रसंगी दोन पाऊले माघारही घेतली. परंतु कोणाही स्थानिक नेत्याला नसेल एवढी नाशिकच्या गल्लीबोळातील राजकीय स्थितीची अचूक माहिती त्यांना होती. अर्थात त्यासाठी त्यांनी गेली काही वर्षे राजकारणापलिकडे जपलेली काही माणसं होती. महाजन या व्यक्तीला स्वार्थापलिकडे मदत करण्यासाठी व त्यांनी सांगितलेली कोणतीही जबाबदारी शंभर टक्के यशस्वी करुन दाखवायची अशी अनेक माणसं त्यांच्या दिमतीला सतत राहिली. नीलेश बोरा हे नाव त्यापैकी एक. ज्या व्यक्तीला पक्षातीलही अनेकांनी सातत्याने हिणविले, दोष दिले पण अडचणीच्या काळात याच बोरांसह काहींनी भाजपची नाव सुखरुप किनार्‍याला लावल्याचे दिसते. महाजन यांचा आत्मविश्वास दांडगा तर आहेच पण त्यांची राजकीय समज अफलातून आहे. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मार्ग काढण्यातील त्यांची मातब्बरी मोलाची आहे. जळगाव, धुळेसह नाशिकमध्येही पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवून देण्याचे अभूतपूर्व काम त्यांनी करुन दाखविले आहे. भाजपच्या यशामागील पैसा, यंत्रणांचा वापर वगैरे कारणांचीही चर्चा चालू आहे, होतही राहील. पण त्याचबरोबरीने महाजनांसह सर्वच नेत्यांचे सत्ता मिळविण्यासाठी चाललेले अपार कष्ट दुर्लक्षिता येणार नाही.

देवयानी फरांदे, सीमाताई हिरे व राहूल ढिकले या आमदारांविषयी मध्यंतरी पक्षातही बरीच चर्चा झाली. त्यांनी उघडपणे महाजन यांच्या काही डावपेचांना विरोध केला. तरीही महाजन यांनी त्याबाबत जाहीरपणे चकार शब्द न बोलता या नाराज नेत्यांना सतत कार्यप्रवण ठेवले. पंचवटी हा भाजपचा बालेकिल्ला आहेच, पण शिवसेनेने तेथे मुसंडी मारण्याची शक्यता पाहून ढिकले यांनी बाकी सारे रागलोभ बाजूला ठेवून पक्षाच्या सर्वच उमेदवारांसाठी घेतलेले कष्ट कामी आले. अशीच कष्टाची कमाई फरांदे व हिरे यांनीही करुन दाखविली. व्यक्तिगत नाराजीला पक्षापेक्षा मोठे न मानण्याची त्यांची भूमिका मोलाची ठरली. कोणत्याही रागालोभापेक्षा पक्ष महत्वाचा. पक्ष असेल तरच आपले अस्तित्व आहे, हा मूलाधार प्रत्येकात व्यवस्थितपणे भिनवण्यात संघटनेला आलेले यश हे देखील यशाचे एक कारण सांगता येईल.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. सत्तेत असले तरी जो विकास भाजप करुन दाखवू शकतो, त्याबाबत शिवसेनेला मर्यादा राहतील, अशी भावना मतदारांची झालेली असू शकते. गंगापूर रोड भागात शिंदे सेनेचे नेते अजय बोरस्ते हे भरपूर मतांनी विजयी होत असतांना त्यांचे इतर सहकारी मात्र मोठ्या फरकाने पराभूत होतात, याचा अर्थ तेथे असलेला भाजपला मानणारा वर्ग व त्याला बोरस्तेंचे काम दिसते हे अधिक महत्वाचे. दरखेपेला बोरस्ते एकटे येतात आणि बाकी पराभूत होतात, याचे कारणच मुळी कामाच्या सातत्यात असते. अशीच गत सुधाकर बडगुजर यांची. ते सर्वाधिक मताधिक्याने विजयी होत असतांना त्यांचे चिरंजीव नेमके मोठ्या फरकाने पराभूत होतात, याचाच अर्थ चिरंजीवांना आणखी काम करण्याची गरज आहे, असे लोक सूचवू पाहतात. गुन्हेगारीचा शिक्का बसलेला, पक्षाने अंतर राखलेले अशाही परिस्थितीत मुकेश शहाणे यांचा विजय हा देखील असाच मतदारांवरील कामाच्या प्रभावाचा दाखला म्हणून सांगता येतो. दिनकर पाटील यांनीही अनेक पक्ष बदलले. पण प्रत्येक वेळीस त्यांनी सर्व सहकार्‍यांनाही विजयी करुन दाखविले, अगदी नवख्या मुलासह. याचा अर्थ त्यांच्या कामाची लोकांना पडलेली भुरळ, असू शकते. शिवसेनेला जागावाटपात तीस ते पस्तीस जागा देण्यास सुरुवातीला भाजप का तयार होता याचे कारण निकालानंतर शिवसेनेला मिळालेल्या जागांमध्ये दिसते. शिवसेनेची झेप कुठपर्यंत जाऊ शकते, याचा नेमका अंदाज महाजनांना होता, असाही निष्कर्ष यातून काढता येतो.

शिवसेनेला मर्यादित यश मिळत असतांना ठाकरे गटाला मात्र १५ जागा मिळतात, हे आश्चर्य आहे. ठाकरे गटाकडे दत्ता गायकवाड व वसंत गिते असे दोघेच नेते उरलेले, त्यातही महत्वाच्या काळात गायकवाड रुग्णालयात भरती. जाहीर सभा वगळता पक्षाकडून कसलीही मदत नाही, अशास्थितीत शिंदेंच्या तुलनेत मिळालेल्या जागा म्हणजे उबाठाचे अस्तित्व नाकारता येत नाही. नाशिकरोड विभागात दहा जागा पटकावून आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे कामही झाले. ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढविणारे हे यश म्हणता येते. दिनकर पाटील अगदी अखेरच्या क्षणी मनसेतून भाजपमध्ये गेल्यामुळे मनसेला कोणी वालीच राहिला नाही. परिणामी त्यांच्या जागांवरही परिणाम झाला. त्यांना मिळालेली एक जागा ही पक्षाचे संघटन किती विस्कटलेले आहे, याचीच साक्ष देते. राष्ट्रवादीला पूर्वीही कधी नाशिक शहराने फार काही दिले नव्हते. गेल्या खेपेलाही सहाच जागा होत्या. यावेळेस पक्षाची शकले होवून देखील केवळ चार जागा मिळाल्या त्यादेखील अजित पवार गटाला. शरद पवारांची राष्ट्रवादी तर भोपळाही फोडू शकली नाही. दोन्ही पक्षांचा एकही प्रमुख नेता साधा फिरकलाही नाही. पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे आधीच भाजपमध्ये जाऊन उमेदवारी करीत होते.

मतदान पार पडल्यानंतर काकांनीही पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा त्याग केला. उद्या जर बग्गा, पांडे, खैरेंप्रमाणेच शेलारही भाजपच्या वळचणीला गेले तर आश्चर्य वाटू नये. अशा पार्श्वभूमीवर साहजिकच जे काही व्हायचे ते नेमकेपणाने झाले. भाजपच्या पथ्यावर पडणारे असे अनेक घटक एकाचवेळी त्यांच्या राशीत आल्याने त्यांचा विजय दृग्गोचर झाला. पराभवाला बाप नसतो आणि विजयाचे शिल्पकार अनेक असतात, असे म्हणतात. भाजपच्या विजयाचे श्रेयही अनेक जण घेऊ पाहतील. पण विरोधी पक्षांच्या पराभवाची जबाबदारी मात्र कोणीही घेणार नाही. किमान यापुढे पक्षाची यंत्रणा सशक्त करणे, कामे करताना सातत्य ठेवणे आणि केवळ दुसर्‍यांना दोष देण्यापेक्षा आपली रेषा वाढविणे हे जर प्रामाणिकपणे करता आले तरच विरोधी पक्षांना काही भवितव्य राहील.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महानगरपालिकांच्या निकालाने धाकधूक वाढली!

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar 2017 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ज्या भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने शर्तीचे प्रयत्न केले, त्याच...