राजूर |वार्ताहर| Rajur
राजुर व परिसरात कावीळच्या साथीने जोर धरला असून आतापर्यंत 100 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अनेकांना संगमनेर, राजूर व अकोले येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या साथीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साथीचे प्रमुख कारण अजून पुढे आले नाही मात्र आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
गावातील पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी सुरू असून जलस्रोतांवर क्लोरीनेशन केले जात आहे. नागरिकांना उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावात जनजागृतीसाठी पत्रके, बॅनर व मोबाईल संदेशाद्वारे मोहीम राबवली जात आहे. आरोग्य विभागाने गावात आरोग्य तपासणी शिबिरे सुरू केली असून शाळा, अंगणवाड्या व सार्वजनिक ठिकाणी तपासण्या केल्या जात जात आहे. अकोले तालुक्यातील विठे येथील प्राथमिक केंद्रातील आरोग्य निरीक्षक डी.एल. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांचे आरोग्य पथकाने राजूरमध्ये येऊन ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणार्या टाकीतील पाणी तपासणीसाठी तसेच इतरही काही ठिकाणातील पाणी व इतर काही पदार्थ तपासणीसाठी पाठवलेले आहे.
ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे, त्याचबरोबर उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, उघड्यावरील थंड पेय तसेच पदार्थ खाऊ नये, तसेच वारंवार जास्त थंड पेय पिऊ नये, असे आवाहन आरोग्य निरीक्षक शेळके यांनी केले आहे.
या संदर्भात राजूर येथे बैठक होऊन सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी आरोग्य विभागाला याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.