नाशिक । प्रतिनिधी Nashik
भक्तीचे विलक्षण तत्त्व हे राम जीवनाचा, रामकथेचा गाभा आहे. भक्तीची उंची गाठल्याशिवाय आयुष्यातला राम कळत नाही. चातकासारखी वाट पाहणे आणि त्या वाट पाहण्यामधील तळमळ सातत्याने वाढत राहणे ही रामकथेतल्या प्रत्येक कथेतील महत्त्वाची बाब आहे आहे. रामकथा माणसातील माणूसपण जागवते, असे विचार आचार्य श्रेयस बडवे यांनी व्यक्त केले.
बळवंत स. देशपांडे, लक्ष्मण स. देशपांडे आणि उर्मिलाताई देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अॅड. एस. एल. देशपांडे आयोजित रामकथा ज्ञानयज्ञाच्या तिसर्या दिवशी आचार्य बडवे बोलत होते. ते म्हणाले, चातकासारखा भक्त असावा हे जसे रामकथा शिकवते; त्याप्रमाणे भक्त हा हंसासारखा नीरक्षरविवेक बाळगून असावा, हेही रामकथा शिकवते.
विश्वास, आत्मविश्वास याला बळकटी देऊन अंधविश्वासाला दूर करणे आणि माणसातले माणूसपण जागवणे हे रामकथेचे सर्वश्रेष्ठ कार्य आहे. आयुष्याच्या वणव्यात रामनामाचा गारवा मिळवण्यासाठी सद्भाव, सद्गुण आणि चारित्र्यसंपन्नता प्रत्येकाच्या ठिकाणी जागृत व्हायला हवी. रामकथेच्या सतत श्रवण-कीर्तनाने ते साध्य होते.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
सीता स्वयंवर कथाभागावेळी महोत्सव साजरा करण्यात आला. कथक नृत्यांगना सुमुखी अथणी आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्यातून आनंद व्यक्त केला. यावेळी आचार्यांना मानसी बडवे, स्वप्निल परांजपे (हार्मोनियम), भालचंद्र बाळ (तबला) यांनी साथसंगत केली. शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.