Tuesday, October 20, 2026
Homeराजकीयशिर्डीतील पराभवामुळे शरद पवारांची साथ सुटली; रामदास आठवलेंची खंत

शिर्डीतील पराभवामुळे शरद पवारांची साथ सुटली; रामदास आठवलेंची खंत

जळगाव । Jalgoan

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले, तरी त्यांच्यातील व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत. मात्र शिर्डी मतदारसंघातील पराभवामुळे आपली राजकीय दिशा बदलली आणि शरद पवारांची साथ सुटली, अशी खंत आठवले यांनी जिल्ह्यातील कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे व्यक्त केली. शिर्डीत पराभव झाला नसता तर कदाचित आपण आजही शरद पवारांसोबतच राहिलो असतो, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

- Advertisement -

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ३० ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील कोथळी (मुक्ताईनगर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी सोहळ्यात आपले प्रसिद्ध मिश्किल आणि खुसखुशीत भाषण केले. या कार्यक्रमात अनेक वर्षांनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि रामदास आठवले एकाच व्यासपीठावर आले होते.

आठवलेंनी सांगितले की, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात झालेला पराभव हा त्यांच्या राजकीय वाटचालीचा मोठा टप्पा (टर्निंग पॉईंट) ठरला. जर शिर्डीत माझा पराभव झाला नसता, तर कदाचित मी आजही शरद पवारांसोबतच राहिलो असतो, अशी मिश्किल पुष्टी त्यांनी जोडली. पुढे हसत ते म्हणाले, पण पवारांसोबत राहिलो असतो तर माझे नुकसान झाले असते, कारण त्यानंतर मला सलग १३ वर्षे केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या विधानावर व्यासपीठावर उपस्थित शरद पवारही खळखळून हसले.

मी ज्यांच्या बाजूला जातो, त्यांना नंतर सत्ता मिळते आणि मलाही मंत्रीपद मिळते. पण मी केवळ मंत्रीपदासाठी कुठेही जात नाही, तर जनसेवेसाठी जातो, अशी त्यांनी आपल्या शैलीत टिप्पण्णी केली. सध्या आपण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्री असल्याने पुन्हा शरद पवारांसोबत जाणे राजकीयदृष्ट्या शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाषणादरम्यान आठवलेंनी एकनाथ खडसे यांच्या दीर्घ राजकीय संघर्षाचे कौतुक केले. तसेच खडसेसाहेब, संधी मिळाली तर आपण दोघं मिळून दिल्लीला जाऊ आणि तिथे एकत्र काम करू अशी खुली ऑफर थेट स्टेजवरूनच दिली. नेहमीप्रमाणे रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात आणि शेवट त्यांच्या खास शैलीतील मराठी शेरोशायरी आणि कवितांनी करून सोहळ्यात हास्याची कारंजे उडवले आणि उपस्थितांची मने जिंकली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; ‘मनोमिलन’ की ‘सीमोल्लंघन’?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या हालचालींना वेग आला असतानाच विधान परिषदेचे सभापती तथा भाजपचे नेते राम शिंदे यांनी पुन्हा एकदा...