Wednesday, January 7, 2026
HomeराजकीयRamdas Kadam : मी खोटं बोलतोय हे उद्धव ठाकरेंनी सांगून दाखवावं; रामदास...

Ramdas Kadam : मी खोटं बोलतोय हे उद्धव ठाकरेंनी सांगून दाखवावं; रामदास कदमांचे खुले आव्हान

मुंबई । Mumbai

शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी गुरुवारी (ता. 3 ऑक्टोबर) नेस्को येथील दसरा मेळाव्यातून खळबळजनक दावा करणारे भाषण केले. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची बॉडी मातोश्रीमध्ये ठेवली होती, असा दावा केला.

- Advertisement -

रामदास कदम यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कदमांच्या या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठलेली आहे. अशातच आता रामदास कदम यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या बॉडीचा छळ केल्याचा आरोपही रामदास कदम यांनी आता केला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंना समोरासमोर येऊन बोलण्याचे आव्हान दिले आहे.

YouTube video player

रामदास कदम यांनी टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांना ‘भूंकणारे कुत्रे’ असे संबोधत, उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. कदम म्हणाले, “मी भूंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देत नाही, पण मातोश्रीवर ५०-५४ वर्षे राहिलेला रामदास कदमसारखा माणूस असं का बोलतो? याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे. मी आज उद्धव ठाकरेंना आव्हान देतो की, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही बोला, मी तुम्हाला उत्तर देईन.” आपल्यावर टीका करणाऱ्या अंबादास दानवे यांच्यासारख्या नेत्यांना आपणच निवडून आणले आणि ते स्वार्थी लोक आहेत, अशी टीका त्यांनी केली. “बाळासाहेब माझे दैवत आहेत. आजही मी पूजेला बसताना त्यांच्यासमोर डोकं टेकवतो. मग रामदास कदमसारख्या ज्येष्ठ माणसाला हे का बोलावे लागते? उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन असे घडले नाही, असे सांगावे,” असे आव्हान कदम यांनी दिले आहे.

रामदास कदम यांनी आपल्या आरोपावर अधिक जोर देत म्हटले की, “उद्धव ठाकरे हे दिसतात तसे नाहीत, ते कपटी आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला, हे मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो आहे.” या प्रकरणाचा अंतिम छडा लावण्यासाठी त्यांनी थेट वैज्ञानिक तपासणीची मागणी केली. “मग यावर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊद्या. मी हे देखील स्पष्ट करतो की, मी कधीही खोटं बोललो नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

बाळासाहेबांच्या निधनानंतर रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या संवादाचाही गौप्यस्फोट कदम यांनी केला. कदम म्हणाले, “मी तेव्हा उद्धव ठाकरे यांना बोललो होतो की, शिवसेनाप्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा. तेव्हा उद्धव ठाकरे मला म्हणाले होते की, ‘मी त्यांच्या (बाळासाहेब ठाकरे यांच्या) हाताचे ठसे घेऊन ठेवले आहेत.’ हे संभाषण आमच्या दोघांमधील आहे. आता उद्धव ठाकरे यांना माझा सवाल आहे की, त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला?” असा अत्यंत गंभीर सवाल उपस्थित करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना अडचणीत आणले आहे.

कदम यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही उल्लेख केला. त्यांनी दावा केला की, त्यावेळी दोन दिवस कोणालाही बाळासाहेबांच्या खोलीत वरती पाठवले नाही. “शरद पवार यांनासुद्धा वरती जाऊ दिले नाही. तेव्हा शरद पवार म्हणाले की, ‘मिलिंद, उद्धव बाळासाहेबांच्या बॉडीला का त्रास देतोय?'” असा धक्कादायक दावाही रामदास कदम यांनी केला. आपण जे बोलत आहोत, ते पूर्णपणे वास्तव आहे, यावर ठाम राहत कदम यांनी प्रसारमाध्यमांना त्यावेळी मातोश्रीमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टरांना याबद्दल विचारण्याचे आव्हान दिले आहे.

रामदास कदम यांनी अखेरीस उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. “तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की, तुम्ही बाळासाहेबांचे ठसे घेतले की नाही? त्यानंतर उद्धव ठाकरे नेमका काय आहे, हे महाराष्ट्रला कळेल,” असे रामदास कदम यांनी सांगितले. रामदास कदम यांच्या या अत्यंत गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले असून, ठाकरे गटाकडून आता यावर काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

उमेदवाराच्या ओल्या पार्टीत ‘चखण्यावरून’ वाद?

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, एका इच्छुक उमेदवाराच्या ‘ओल्या पार्टी’तून वाद निर्माण झाल्याची चर्चा सध्या...