मुंबई | Mumbai
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला होता. तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे ऐकले आणि ते काँग्रेससोबत राहिले, असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले.
काय म्हणाले रामदास कदम
“शिवसेनेचे आमदार ज्यावेळी गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना म्हटले होते की, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही काँग्रेसची साथ सोडा आणि संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पत्रकार परिषद घ्या आणि सांगा. त्यानंतर गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांना खासगी विमानाने दोन तासांत ‘मातोश्री’वर नाही आणले तर माझे नाव रामदास कदम नाही. उद्या गणपती बसणार आहेत, मी गणपतीची शपथ घेऊन सांगतोय हे शंभर टक्के खरे आहे. मग त्यानंतर उद्धव ठाकरे मला म्हणाले हो मी तुम्हाला फोन लावून सांगतो. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार ‘मातोश्री’वर पोहोचले आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय बदलला. त्यानंतर मलाही उद्धव ठाकरेंनी निरोप दिला की, आम्ही कायदेशीर लढाई लढू”, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
कदम पुढे म्हणाले, आम्हाला महायुती टिकवायची आहे. समजा जर कुणी चुकत असेल तर त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. अनेकांना गद्दारीची व्याख्या कळली नाही. आम्ही गद्दारी केलेली नाही. खरे तर गद्दारी करण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनीच केलेले आहे. गद्दारांना बरोबर घेण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले”, असा आरोपही त्यांनी केला. तसेच यावेळी रामदास कदम यांनी महायुतीबाबत बोलताना काहीसी मवाळ भूमिका घेतल्याचंही दिसून आले.
काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी भाजपवर आगपाखड केली होती. मात्र, या कार्यक्रमात त्यांचा भाजपबाबतचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसला. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे. जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचे आहे. आमचे एकच ध्येय आहे. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला विकास करायचा आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा