शहादा । ता. प्र.-
तालुक्यातील घोडलेपाडा येथील भारतीय सैन्य दलातील सी.आर. पी.एफ.चे जवान मेजर रमेश सजन वसावे यांना राजस्थानमधील अजमेर या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना काल दि.10 जून रोजी वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात घोडलेपाडाजवळील प्राथमिक शाळेजवळील मैदानात उद्या दि.12 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की. शहादा तालुक्यातील मंदाणे येथून तीन किलोमिटर अंतरावर घोडलेपाडा हे शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव असून हा बाराशे लोकवस्तीचा पाडा चांदसैली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे.
या पाड्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेजर रमेश वसावे यांना काल दुपारी कर्तव्यावर असताना वीरमरण आले. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सुलतानपूर येथील शासकीय आश्रमशाळेत झाले. अकरावी व बारावी शहादा येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण करून सैन्यदलात भरतीसाठी रमेशने प्रयत्न सूरू केला. 2005 मध्ये अखेर त्यांची सीआरपीएफ मध्ये निवड झाली. पहिली नेमणूक जम्मू काश्मीर, त्यानंतर दिल्ली, चंदीगड, झारखंड, राजस्थान मधील बिलवाडा या ठिकाणी झाली. आता काही दिवसापूर्वी त्यांची झारखंड मध्ये बदली झाली होती. त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुले दोन दिवसापूर्वीच आपल्या गावी परतले होते. रमेश आता झारखंडमध्ये बदली च्या ठिकाणी रुजू होणार होते. अखेर राजस्थान येथून कार्यमुक्त होण्याआधी च क्रुर काळाने झडप घातली आणि मेजर रमेश वसावे यांना काल दुपारच्या सुमारास वीरमरण आले. त्यांचे पार्थिव राजस्थान येथून त्यांच्या मूळ गावी विशेष वाहनाने दाखल होणार आहे.
शहीद झालेल्या मेजर रमेश वसावे यांच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी एका अपघातात मृत्यू झाला होता. रमेश वसावे हे कुटुंबात मोठे असल्याने वयोवृद्ध आई शेवंता बाई,लहान दोन भावंडे, तीन बहिणी यांची जबाबदारी येवून गेली. मेजर रमेश वसावे यांना दोन मुले असून मोठा मुलगा तन्मय हा आठवीला नंदूरबार येथे तर दुसरा मुलगा नैतिक हा शहादा येथील विकास हायस्कूल येथे सहाविला आहे. पत्नी सिता या गृहिणी आहेत. भावाची मुलगी साक्षी हिला त्यांनी दत्तक घेतले असून ती चौथीच्या वर्गात शिकत आहे. या घटनेचे वृत्त गाव आणि परिसरात येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला आहे. गाव व परिसर सुन्न झाला आहे. उद्या दि.12 रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहादा येथून येताना त्यांना शहादा मंदाणे मार्गावर ठिकठिकाणी श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.