अहमदनगर । प्रतिनिधी
महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नगर शहरात मुस्लिम समाजाकडून शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता.
मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात येताच मोर्चेकर्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकातच रस्त्यावर ठाण मांडले. अचानक सुरू झालेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचनादरम्यान केलेल्या वक्तव्याने मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला आहे. शुक्रवारी दुपारच्या नमाज पठणनंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव कोठला येथे दुपारी तीन वाजता मोठ्या संख्येने जमले होते.
हे हि वाचा : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा! ‘वाळवी’ ठरला सर्वोकृष्ट मराठी सिनेमा… संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
कोठला येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झाला. यामध्ये युवकांनी हातात काळे झेंडे घेऊन व हातावर, डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधून मोर्चात सहभाग नोंदवला. नगर-संभाजीनगर मार्गे मोर्चा डीएसपी चौकात आला असता, युवकांनी ठिय्या देत चक्का जाम आंदोलन केले. संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
मोर्चामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. उपअधीक्षक भारती यांनी आंदोलकांशी संवाद साधून सदर वक्तव्याप्रकरणी नगर शहरातील पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन मोर्चेकर्यांना दिले.
हे हि वाचा : नाशिक शहरात बंददरम्यान दोन गट आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात
दरम्यान, महंत रामगिरी महाराज यांच्यावर नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख साहेबान अन्सार जाहागिरदार यांनी फिर्याद दिली आहे. रामगिरी महाराज यांनी चुकीचे वक्तव्य करून मुस्लिम धर्माच्या भावना दुखविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पंचाळे (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे हे वक्तव्य करण्यात आल्याने हा गुन्हा एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.