एकरूखे (वार्ताहर)
आपण गुरूला देव म्हणून पुजतो. साईबाबांना मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. साईबाबा मुस्लिम नव्हते. साईबाबा रामभक्त होते. ते जर मुस्लिम असते तर त्यांनी शिर्डीत रामजन्मोत्सव का सुरू केला असता ? वाराणसीच्या मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती कढण्यामागे काहीतरी षडयंत्र आहे. असे कृत्य करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केली आहे.
सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते एकरुखे येथील वज्रेश्वरी देवीची नवरात्रातील पहिली आरती पार पडली. यावेळी रामगिरी महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. जेसीबीतून पुष्पवर्षा करत ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक पार पडली. यावेळी रामगिरी महाराजांनी साईबाबांबद्दल मतं मांडली. ते म्हणाले, साईबाबा संत होते. संताला कुणी देव म्हणून पुजत असेल तर तो भावनेचा प्रश्न आहे.
साईबाबा मुस्लिम असते तर त्यांनी शिर्डीत रामजन्मोत्सव का सुरू केला असता? असा सवाल करत ते म्हणाले, साईबाबांच्या वास्तव्याची जागा मशिदीची जरी असली, तरी त्याला द्वारकामाई म्हंटले जायचे. म्हणजेच साईबाबा भगवान कृष्णाचे देखील भक्त होते. साईबाबा मंदिरात सनातन, वैदिक पद्धतीने पूजापाठ केला जातो. इस्लाम धर्माचा त्याठिकाणी काहीही संबंध येत नाही. गंगागिरी महाराजांनी सर्वांना साईबाबांची ओळख करून दिली. हे बालक शिर्डीचे भाग्य चमकवणार अशी भविष्यवाणी केल्याचे रामगिरी महाराज यांनी सांगितले.