शिरूर (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील रांजणगाव – सोनेसांगवी रस्त्यावर सोनेसांगवी पठाराजवळ पिकअप जीपने समोरून दिलेल्या धडकेत दूचाकीवरील तरूण जागीच ठार झाला. काल (ता. २९) रात्री आठ वाजता झालेल्या या अपघातप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील पिकअप चालकाला अटक केली.
दीपक राजेश थोरात (वय २२, रा. शिंदेवस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) असे या अपघातात मृत्युमूखी पडलेल्या दूचाकीस्वार तरूणाचे नाव असून, त्याचे मामा वैभव शिवाजी शिंदे (रा. शिंदेवस्ती, टाकळी हाजी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पिकअप चालक संजय सदाशिव वाळके (वय ३९, रा. माळीमळा, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली असून, शिरूर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या अपघातातील मृत तरूण दीपक थोरात हा टाकळी हाजी येथे मामा वैभव शिंदे यांच्या सलून मधेच काम करीत होता.
काल सायंकाळी रांजणगाव येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी व कौटुंबिक कामासाठी तो आपल्या दूचाकीवरून (क्र. एमएच १२ युवाय ७११२) आला होता. रांजणगावातील काम आटोपून तो रांजणगाव – सोनेसांगवी रस्त्याने टाकळी हाजी कडे जात असताना सोनेसांगवी पठाराजवळील धनगरवाडा हॉटेल नजीक विरूद्ध दिशेने भरधाव आलेल्या पिकअप जीपची (क्र. एमएच १२ झेडयु ४४१५) दूचाकीला समोरून धडक बसली. यात दूचाकीस्वार दीपक च्या डोक्याला, चेहऱ्याला आणि हातापायांना गंभीर दूखापती झाल्या. या धडकेत त्याचा डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला. स्थानिकांनी गंभीर अवस्थेत त्याला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतू मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यु झाला.
या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम, उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर पळून जाणारी पिकअप जीप स्थानिकांनी पकडली व चालक संजय वाळके याला पोलिसांच्या ताब्यात दिले. तो नशेत होता, असे स्थानिकांनी सांगितले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत




