रांजणखोल (वार्ताहर)
रांजणखोल (विठ्ठलवाडी अभंगवस्ती) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोमवारी रात्री चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे १० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळी मंदिराजवळ राहणारे भाऊसाहेब अभंग दर्शनासाठी मंदिरात गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस पाटील कृष्णा अभंग आणि सिताराम अभंग यांना दिली. त्यानंतर त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या चोरीमुळे रांजणखोल ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंदिर परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या असून, आता पुन्हा एकदा दानपेटीवर चोरट्यांनी डोळा ठेवला आहे. विशेष म्हणजे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या शेजारीच श्री संत रोहिदास महाराजांचे मंदिरही असून दोन्ही ठिकाणी भक्तांची मोठी श्रद्धा आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मेढे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश रोकडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, भुरट्या चोरांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलीस पाटील कृष्णा अभंग यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.