नाशिक । प्रतिनिधी Nashik
तब्बल सहा वर्षांनंतर रणजी कंरडकचे हे सामने नाशिकमध्ये होणार आहेत. बीसीसीआय आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
उद्यापासून सुरु होणार्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यासाठी महाराष्ट्र व बडोदा हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआयतर्फे, हा चार दिवसीय सामना नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे. आज महाराष्ट्र व बडोदा या दोन्ही संघांनी सकाळपासूनच साधारण एक तास कसून सराव केला.
सरावादरम्यान नाशिकच्या खासकरून युवा क्रिकेटरसिकांचा जोरदार उत्साह बघावयास मिळाला. आज देखील बडोदा संघ कर्णधार कृणाल पंड्याने मैदानाच्या सीमारेषेवरील चाहत्यांना सेल्फीचा आनंद घेऊन दिला. महाराष्ट्र संघातील नाशिकचे सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व रामकृष्ण घोष यांना सराव करतांना बघून चाहते खूष झाले. चाहत्यांच्या अमाप, अनावर उत्साहामुळे ऋतुराज गायकवाड व कृणाल पंड्या यांना गाडीपर्यत पोहचण्यासाठी अलोट गर्दीतून वाट काढावी लागली.