पुणे | Pune
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर अत्याचार केला अन् पळ काढला. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला बळजबरीने बसमध्ये ओढून नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ही सर्व घटना मंगळवारी रात्रीच घडल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. मात्र, तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यादरम्यान आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून वेगवेगळ्या पथकांमार्फत शोधमोहीम सुरू केली आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एसटी स्थानक परिसरातील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा