नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द्रौपदी मुर्मूंना ‘पुअर लेडी’ म्हटले. त्यांच्या या टीकेवर आता विविध स्तरातून टीका व्हायला लागली असून राष्ट्रपती कार्यालयातून यावर उत्तर देण्यात आले आहे. सोनिया गांधींचे विधान अस्वीकार्य आहे, असे कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
संसदेतील माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी टिप्पणी केली आहे आणि म्हणूनच ती अस्वीकार्य आहे. या नेत्यांनी म्हटले आहे की राष्ट्रपती शेवटपर्यंत खूप थकल्या होत्या आणि त्या बोलू शकत नव्हत्या”, असे राष्ट्रपती भवनातील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
राष्ट्रपती भवनाकडून नाराजी व्यक्त
“राष्ट्रपती भवन स्पष्ट करू इच्छिते की राष्ट्रपती कोणत्याही टप्प्यावर थकल्या नव्हत्या. खरेच, त्यांचा असा विश्वास आहे की उपेक्षित समुदायांसाठी, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बोलणे थकवणारे असू शकत नाही. राष्ट्रपती कार्यालयाचा असा विश्वास आहे की कदाचित या नेत्यांनी हिंदीसारख्या भारतीय भाषांमधील वाक्प्रचार आणि भाषण समजले नसेल आणि त्यामुळे त्यांचा गैरसमज निर्माण झाला असेल. कोणत्याही परिस्थितीत अशा टिप्पण्या वाईट, दुर्दैवी आणि पूर्णपणे टाळता येण्यासारख्या आहेत”, असेही राष्ट्रपती भवनातून स्पष्ट करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘देशाने पुन्हा काँग्रेसचे शाही राजघराणे पाहिले. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत संबोधित केले. ओरिसातील एका गरीब कुटुंबातून त्या या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी नाही, उडिया भाषेत लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी आज संसदेत उत्कृष्ट भाषण केले. पण काँग्रेसचच्या राजघराण्याने त्यांचा अपमान केला. राजघराण्यातील एका सदस्याने (राहुल गांधी) राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणे असल्याचे भाष्य केले. तर, आणखी एका सदस्याने (सोनिया गांधी) पुअर लेडी म्हटले.’
‘एका आदिवासी महिलेचे बोलणे काँग्रेसला कंटाळवाणे वाटते. हा देशातील १० कोटी आदिवासी बांधवांचा अपमान आहे. काँग्रेस प्रत्येकवेळी गरीब, दलित आदिवासींचा अपमान करते. काँग्रेसला परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे आणि शहरी नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे आवडते,’ अशी टीका पीएम मोदींनी यावेळी केली.
सोनिया गांधी काय म्हणाल्या?
संसदेच्या अर्थसंकल्पयीय अधिवेशनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषण केले. या अभिभाषणावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणानंतर संसद परिसरात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपसात बोलत होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोनिया गांधींना प्रश्न विचारले. सोनिया गांधींना प्रश्न विचारताच राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या भाषणाला कंटाळवाणे म्हटले. ते म्हणाले की राष्ट्रपती जुन्याच गोष्टी पुन्हा सांगत आहेत. यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या की, “शेवटी राष्ट्रपती खूप थकल्यासारख्या होत होत्या. त्यांना बोलूही शकत नव्हत्या, बिचाऱ्या… (पुअर लेडी)”.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा