मुंबई | Mumbai
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दिली असून त्यांनी टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हे देखील वाचा : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “टाटा या नावावरील विश्वास रतन टाटा यांनी आणखी दृढ केला. टाटा परिवाराचे आणि मुंबईचे नाते अतूट राहीले आहे. रतन टाटा यांनी मुंबईवरही भरभरून प्रेम केले. मुंबईसाठी ते नेहमीच भरीव योगदान देत आले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, लोक कल्याणकारी उपक्रमाला ते नेहमीच पाठबळ देत आले आहेत. रतन टाटा यांच्याकडे उद्योजकतेची विशाल दृष्टी होती. त्यातही मानवता हा केंद्रबिंदू होता,हे त्यांच्याशी संवाद साधताना लक्षात येत राहायचे. मीठापासून ते विमानापर्यंतचा उद्योग, व्यवसाय करताना रतन टाटा यांनी मातीशी, मानवतेशी असलेल्या नात्यात कधीही अंतर येऊ दिले नाही. त्यांच्या निधनामुळे आज दुर्मिळ रत्न हरपले आहे. नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतन टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा समुहाला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : महायुतीत वादाची ठिणगी! नांदगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने ठोकला दावा; समीर भुजबळ मैदानात?
सर्व शासकीय कार्यक्रम रद्द
रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आता राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली (Tribute) वाहिली जात आहे. आत रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
एक दिवसाचा दुखवटा जाहीर
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा