Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray Letter To PM Modi : प्रत्येकाच्या मनातील भाव आहे…; राज...

Raj Thackeray Letter To PM Modi : प्रत्येकाच्या मनातील भाव आहे…; राज ठाकरे यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मोठी मागणी

मुंबई | Mumbai
रतन टाटा यांच्या निधनाची वार्ता पसरताच सोशल मीडियावर सर्वसामान्य उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्योजक रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावे ही मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरेंनी काय म्हंटले पत्रात?
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सस्नेह जय महाराष्ट्र, ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात. त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही!

- Advertisement -

काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहिले. आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून?

त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे. तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला.

आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या