अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सध्या सर्वत्र लाडकी बहिण योजनेचे पाच महिन्यांचे 7 हजार 500 रुपये मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु राज्य सरकारने जानेवारी महिन्यात याच लाडक्या बहिणींना सुरू केलेला साडी वाटपाचा कार्यक्रम अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. जिल्ह्यात 9 महिन्यांनंतरही 4 हजार 990 महिलांना साड्या मिळण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, यातील बहुतांशी महिला सापडत नसल्याने अथवा संबंधित महिलांचे स्थलांतर झाल्याने अथवा अन्य योजनांचा लाभ मिळत नसल्याने या साड्यांचे वाटप झाले नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारने जानेवारी महिन्यात अंत्योदय रेशन कार्डधारक महिला लाभार्थ्यांना वर्षभरातून एकदा मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मार्च महिन्यापासून रेशन दुकानांमधून साड्यांचे वितरण सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यातील सुमारे 88 हजार 37 अंत्योदय रेशन कार्डधारकांना महिलांना साडी वाटपाचे नियोजन करण्यात येणार होते. राज्य यंत्रमाग महामंडळाने लाल, हिरवा, पिवळा व निळ्या रंगाच्या साड्यांचा पुरवठा केला होता.
दरम्यान आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर शिक्षक-पदवीधर निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील साडी वाटप थांबले होते. मात्र, त्यानंतर ते सुरू झाले. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 887 रेशन दुकानांमधून 94.33 टक्के म्हणजे 83 हजार 47 साड्यांचे वाटप करण्यात आले आहे. तर 4 हजार 990 साड्यांचे वाटप होणे बाकी आहे.
साड्या रेशन दुकानात धूळखात पडून
आधी लोकसभा आणि त्यानंतर पुन्हा नाशिक शिक्षक पद्वीधर निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्ह्यातील साड्या वाटप रखडले. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानांतून ई-पॉस मशीनद्वारे साड्यांचे वाटप करण्यात येत होते, परंतु मधल्या काळात या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे वाटप थांबले होते. सरकारकडून मोफत साड्या देण्यात आल्या आहेत, परंतु लाभार्थी न आल्याने साडे चार हजारांहून अधिक साड्या रेशन दुकानात धूळखात पडून आहेत. यात पारनेर 72, श्रीगोंदा 229, नगर 149, राहुरी 219, संगमनेर 235, जामखेड 261, राहाता 260, श्रीरामपूर 286, नगर शहर 103, अकोले 387, शेवगाव 695, पाथर्डी 476, कोपरगाव 522, कर्जत 337, नेवासा 769 असे आहेत.