रावेर|प्रतिनिधी-
सध्या वेस्टइंडीज आणि अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप सामने सुरु आहे. यात रावेर येथून नाशिक स्थायिक झालेल्या आठवले परिवाराचा प्रतिक ओमान देशाकडून खेळत आहे. प्रतिक जागतिक पातळीवर क्रिकेट खेळत असल्याने, रावेरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाने रावेरात आनंदोत्सव होत आहे.
येथील डॉ.राजेंद्र आठवले व अनंत आठवले यांचे बंधू श्रीकांत आठवले सध्या नाशिक येथे उद्योग व्यवसायानिमित्त स्थायिक आहे.त्यांचा मुलगा प्रतिक सध्या ओमान देशात नोकरी करत आहे.त्या ठिकाणी खेळाडूसाठी असलेल्या राखीव कोट्यातून नोकरी करत असून,आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून खेळण्याची संधी मिळाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
प्रतिक हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ओमान देशाच प्रतिनिधित्व करत असला तरी रावेर येथे त्यांच्या या यशाचा रावेरकरांना सार्थ अभिमान आहे.त्यांच्या या करिअरसाठी अनेकानेक शुभेच्छा मिळत आहे.या यशाबद्दल प्रतिक आठवले याचे वडील श्रीकांत आठवले यांनी सांगितले कि,प्रतिक याने आठवले परिवाराचे नाव जागतिक पातळीवर नेले आहे.त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती.त्याला आमच्याकडून पूर्णपणे क्रिकेट खेळायला प्रोत्साहन मिळाले आहे. आणि आम्ही तिघे भाऊ क्रिकेटमध्ये राज्य पातळीवर खेळले असल्याने,साहजिकच प्रतिकला देखील क्रिकेटचे बाळकडू मिळाले असल्याने,तो जागतिक पातळीवर क्रिकेट खेळून आठवले परिवाराचे नांव उज्वल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ओमान विरुद्ध नेदरलँड्स अशा सामन्यात प्रतिक आठवले याचा सहभाग नव्हता,मात्र दि.६ रोजी झालेल्या ओमान विरुद्ध आष्ट्रेलिया या सामन्यात त्याला यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले होते.या सामन्यात प्रतिक याने दमदार कामगिरी बजावली.मात्र तो शून्य धावावर बाद झाला आणि ओमान संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.