Friday, October 9, 2026
Homeक्राईमAhilyanagar : हत्याकांड समोर, तरी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद!

Ahilyanagar : हत्याकांड समोर, तरी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद!

चव्हाण खून प्रकरणात तोफखाना पोलिसांची सुरूवातीची कार्यवाही वादाच्या भोवर्‍यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दुचाकीचा कट लागून चप्पल तुटल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले. धारदार हत्याराने केलेल्या हल्ल्यात रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय 55, रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) यांचा मृत्यू झाला. भरदिवसा आणि वर्दळीच्या बालिकाश्रम रस्त्यावर ही घटना घडली. मात्र, घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळलेल्या चव्हाण यांचा मृत्यू झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी सुरूवातीला थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आकस्मात मृत्यूची नोंद (एडीआर) केली. त्यानंतर तब्बल तीन तासांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे तोफखाना पोलिसांच्या सुरूवातीच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- Advertisement -

बुधवारी (7 ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे पावणेपाच वाजता रवींद्र चव्हाण आणि मिखाईल भाकरे हे दुचाकीवरून बालिकाश्रम रस्त्याने भूतकरवाडीकडे जात होते. यावेळी न्यू आर्ट्स कॉलेजच्या मागील बाजूस ही घटना घडली. रवींद्र चव्हाण यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याचे मिखाईल भाकरे यांनी चव्हाण यांचा मुलगा मंथन यांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बालिकाश्रम रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. एशियन फूड कोर्टसमोर रक्ताचे थारोळे पडलेले पोलिसांना दिसले. जखमी रवींद्र चव्हाण यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरील परिस्थिती आणि हल्ल्याची माहिती पाहता प्रकरण खुनाचे असल्याचे स्पष्ट झाले होते. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपासाबाबत सूचना केल्या. मात्र, त्यानंतरही सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसताना, अपघात, आत्महत्या किंवा बेवारस मृतदेह आढळल्यास पोलिसांकडून प्राथमिक स्वरूपात आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केला जातो. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाते. रवींद्र चव्हाण यांच्या प्रकरणात मात्र परिस्थिती वेगळी होती. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर धारदार हत्याराने हल्ला झाल्याचे समोर आले होते. घटनास्थळी रक्ताचे थारोळे होते. चव्हाण यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीनेही हल्ल्याची माहिती दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. अशा परिस्थितीत सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद का करण्यात आली, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

यानंतर सुमारे तीन तासांनी मंथन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुरज रवी सोनवणे (वय 19), प्रेम उर्फ सोनुल्या रवी सोनवणे (वय 21, दोघे रा. सिध्दार्थनगर, अहिल्यानगर) आणि त्यांच्या इतर अनोळखी साथीदारांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर पसार झालेल्या सुरज आणि प्रेम या दोघांना तोफखाना पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक केली. दोघे सख्खे भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांनाही माहिती नाही
रवींद्र चव्हाण यांच्या मृत्यूनंतर खुनाची परिस्थिती स्पष्ट असतानाही सुरूवातीला एडीआर का नोंदविण्यात आला, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणे अपेक्षित आहे. ही नोंद अनवधानाने झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याचे स्पष्टीकरण तपासातून समोर येणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असताना ही प्रक्रिया घडल्याने या प्रकरणातील पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत अधिकच प्रश्न निर्माण झाले आहेत. या नोंदीची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनाही सुरूवातीला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एडीआरची नोंद नेमकी कोणत्या स्तरावर आणि कोणत्या कारणाने करण्यात आली, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी अवघी एकाची माघार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा केल्यानंतर मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दखल झालेले आहे. छानणीनंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर पहिल्या दोन...