Saturday, July 13, 2024
Homeमुख्य बातम्याविजयानंतर गिरीश बापट यांची भेट; रवींद्र धंगेकरांमधील सुसंस्कृत राजकारण्याचं दर्शन

विजयानंतर गिरीश बापट यांची भेट; रवींद्र धंगेकरांमधील सुसंस्कृत राजकारण्याचं दर्शन

पुणे(प्रतिनिधि)

- Advertisement -

मी बापटांसोबत दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. पण कधी संघर्ष झाला नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली. पण सत्ताधारी पक्षाने यंदा खूप चुकीचे राजकारण केले, पैशाचे राजकारण करत निवडणूक लढली. बापटांनी कधी पैसे वाटले नाही, सर्वसमावेशक प्रेमाने राजकारण केले. त्यामुळेच जनतेने त्यांच्या पदरात मते टाकली, असे मत कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

रवींद्र धंगेकर यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. धंगेकर म्हणाले, बापटांनी माझे अभिनंदन केले. तू चांगली मेहनत घेतली, त्याचे फळ तुला मिळाले. नियोजन कर आणि चांगल्या पद्धतीने कामाचा पाठपुरावा कर तुला निश्चित यश मिळेल. तुला अडचण आली, गरज वाटली तर तुला पूर्णपणे मदत करीन.

वडीलकीच्या नात्याने त्यांनी सूचना केल्या. पक्षविरहीत राजकारण करताना त्यांनी कधी माणसे संपवण्याचे कुरघोडीचे राजकारण केले नाही. विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी ताकद दिल्याचे मी पाहिले. म्हणून मी त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन नक्की करेन, असेही त्यांनी सांगितले.

गिरीश बापटांना मी निवडणुकी आधी भेटलो नाही. कारण त्यांच्याविषयी मनात संशयाची पाल चुकचुकायला नको. त्यांच भविष्य भाजपात घडलं आहे. त्यामुळे निवडणूक काळात किंवा त्यापूर्वी त्यांना भेटलो नाही. आता निवडणूक संपली आहे. म्हणून त्यांना आता भेटलो. मला भेटणं गरजेचं होतं. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं आवश्यक होतं, असं धंगेकर म्हणाले. बापटांच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी दरम्यान, खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोरचं काँग्रेस कार्यकर्त्यांची बँनरबाजी केली आहे.

कसबा गणपतीसमोर समोर असलेल्या बापटांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोरचं बॅनरबाजी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या हु इज धंगेकर? या प्रश्नाला धीस इज धंगेकर… या पोस्टरच्या माध्यमातूनचं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. बापटांच्या कार्यालयासमोरचं हा बॅनर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या