Friday, May 3, 2024
Homeनगर‘रयत’मधील नोकर भरती घोटाळा : घोटाळ्याचे सूत्रधार नगर जिल्ह्यातील !

‘रयत’मधील नोकर भरती घोटाळा : घोटाळ्याचे सूत्रधार नगर जिल्ह्यातील !

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली व शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेमधील कथित नोकरभरती घोटाळ्याची

- Advertisement -

सर्व सूत्रे नगर जिल्ह्यातून हलवली जात होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लोक या घोटाळ्यामध्ये बळी पडले असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल यातून झालेली आहे. अनेकांना आजपर्यंत फक्त आश्वासने मिळाली आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी या घोटाळ्याची वरिष्ठ पातळीवरून गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करावी व दोषींवर गुन्हे दाखल करावेत. तसेच मागील दहा वर्षातील सर्व नियुक्त्यांची सुद्धा तपासणी व्हावी, अशी मागणी होत आहे.

‘रयत’मध्ये नोकर भरती घोटाळा होत असल्याची चर्चा गेली अनेक वर्षे दबक्या स्वरामध्ये होती. जिल्ह्यातील अनेक मातब्बरांची नावे यासंदर्भात चर्चिली जात होती. परंतु उघडपणे याबद्दल कोणीही बोलत नव्हते. परंतु अनेकांनी याबाबत अर्जाद्वारे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच राज्यपाल यांच्याकडे तक्रारी केल्या.

पवारांनी या तक्रारींची आधी आपल्या यंत्रणेमार्फत माहिती घेतली आणि ही माहिती ‘कन्फर्म’ होताच संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक घेऊन त्यामध्ये संस्थेचे माजी सचिव प्राचार्य भाऊसाहेब कराळे व अरविंद बुरुंगले या नगर जिल्ह्यातील दोन मातब्बर पदाधिकार्‍यांचे तडकाफडकी राजीनामे घेतले. यांचे फक्त राजीनामे घेऊन भागणार नाही तर यांच्याशी संबंधित सर्व घटकांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

रयतच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच राज्याच्या सर्व भागांमध्ये रयत मधील सर्वात मोठ्या घोटाळ्याची जोरदार चर्चा असून यामध्ये अनेक गोरगरीब शेतकर्‍यांची मुलं आर्थिक शोषणापायी आर्थिक संकटात सापडली आहेत. त्यातून काहींनी आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखवला आहे. मागील दहा वर्षांमध्ये रयतमध्ये ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत, त्या सर्वांची सखोल चौकशी करून गैरमार्गाने झालेल्या नियुक्त्या रद्द करून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीमध्ये नगर जिल्ह्याचा मोठा वाटा आहे हे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मान्य आहे. म्हणूनच त्यांनी रयतची सर्व महत्त्वाची पदे नगर जिल्ह्यामध्ये देऊन जिल्ह्यातील लोकांना पदाधिकारी होण्याची संधी दिली. एवढेच नव्हे तर मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर जबाबदारी टाकून त्यांच्या कार्यात कधीच हस्तक्षेप केला नाही. याचाच गैरफायदा घेत जिल्ह्यातील रयतमधील काही नोकरदार वर्गातील मोठ्या प्रस्थांनी आपले बस्तान बसवले व त्यातून गैरप्रकार करून संस्था आज बदनाम केली आहे.

संस्थेमध्ये घडलेल्या घोटाळ्या बद्दल सर्वत्र मोठी चर्चा आहे. नगर जिल्ह्यात सुद्धा अनेक रयत सेवकांना गेली पंधरा ते वीस वर्षांपासून कायम सेवेच्या ऑर्डरी मिळालेल्या नाहीत तसेच अनेकांना गैरसोयीच्या बदल्या करून देण्यात आलेल्या आहेत. ज्यांचे सूत जुळले त्यांची सोय झाली. परंतु ज्याच्याकडे वशिला नाही अशांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जाऊन आपली नोकरी करावी लागत आहे.

भाऊसाहेब कराळे आणि बुरुंगले हे फक्त समोर आलेले चेहरे आहेत. मात्र त्यांच्या पाठीशी एक मोठी टोळी नगर जिल्ह्यामध्ये रयतमध्ये कार्यरत असल्याची जोरदार चर्चा सध्या रयत वर्तुळामध्ये होत आहे. फार पूर्वीपासून हे प्रकार होत असून यामुळे कधीकाळी गोरगरीब, दीनदलित, शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी प्रसिद्ध असलेली कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था गेले काही दिवस समाजातील एका विशिष्ट घटकासाठी कार्यरत असल्याची चर्चाही होत आहे.

रयतमधील नगर जिल्ह्यातील जे पदाधिकारी झाले आहेत ती सर्व मोठ्या घराण्यातील माणसं आहेत. यातील काहींच्या नावाचा गैरवापर करून रयतमधील नोकरदार वर्गाने आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.

रयत उत्तर विभागाची संपूर्ण समिती बरखास्त करून नवीन नियुत्या करण्यात याव्यात तसेच रयतमधील सेवकांची मते जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी गोपनीय पद्धतीने सेवकांची मते जाणून घ्यावीत. ज्या तक्रारींमध्ये तथ्य असेल त्यावर तातडीने कार्यवाही करावी आणि रयत मधील हा बोकाळलेला भ्रष्टाचार समोर आणून दोषींना शासन करावे, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.

श्रीरामपूर कनेक्शन उजेडात आणावे !

रयत मधील जिल्ह्यातील टोळीत श्रीरामपुरातील काहींचा समावेश आहे. एका दिवंगत पदाधिकार्‍यांच्या पुढे पुढे करून या टोळीने सुद्धा खूप लोकांना गंडविले असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. पूर्वी श्रीरामपूरमध्ये एका कॉलेजला प्राचार्य असलेल्या व्यक्तीने या टोळीच्या माध्यमातून सदर दिवंगत पदाधिकार्‍यांचा विश्वास संपादन करून फार मोठी माया गोळा केल्याचीही चर्चा आता होत आहे.त्याचबरोबर या टोळीच्या माध्यमातून बर्‍याच जणांना नियुक्त्या निवडी करण्यात आल्या आहेत. त्या सर्वांची देखील चौकशी होऊन श्रीरामपूर कनेक्शन सुद्धा उजेडात आणावे, अशी मागणी रयत सेवकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या