श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष राज्याच्या कानाकोपर्यात पसरला तसा कर्नाटक, गुजरात राज्याच्या सीमेवर देखील शाखा आहेत. रयतच्या विस्तारात नगर जिल्हा अग्रभागी राहिला. शंकरराव काळे, रावसाहेब शिंदे या सगळ्यांनी रयतच्या विस्तारासाठी योगदान दिले असल्याचे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले. श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात खा. पवार बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, भगीरथ शिंदे, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, माजी आ. राहुल जगताप, मीनाताई जगधने, राजेंद्र फाळके, विकास देशमुख, कुंडलिकराव दरेकर, अण्णासाहेब शेलार, राजेंद्र नागवडे, साजन पाचपुते, शिवाजी पाचपुते, महावीर पटवा, बाजीराव कोरडे, सुभाष गांधी, राजेंद्र खेडकर, नवनाथ बोडखे, गीता चौधरी, दिलीप भुजबळ, मिलिंद दरेकर, संतोष दरेकर, सुभाष रामराव कोरडे उपस्थित होते.
यावेळी खा. पवार म्हणाले, रयत शिक्षण संस्था ही काळाबरोबर बदलणारी संस्था आहे. आजचे युग हे डिजिटल युग आहे. या युगाप्रमाणेच शिक्षण द्यायला हवे. आधुनिकता शिक्षणात आणायला हवी. त्यातूनच ग्रामीण विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलतील. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. समाजाच्या कल्याणासाठी या महापुरुषांनी मोठे काम केले. स्त्री शिक्षणाबरोबर शेतकरी कल्याणाचा विचार महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी त्या कालखंडात मांडला होता. शेतकर्याचे दुधाचे उत्पादन उत्पादन वाढले पाहिजे. संकरित वाण तयार केले, तरच शेतकर्यांचे उत्पादन वाढेल व शेतकरी समृद्ध होईल, असे विचार फुले मांडत होते. राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे राजे होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा वारसा चालवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते, तर ते राष्ट्रपुरुष होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या झोपडीत ज्ञानगंगा गेली पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून गोरगरिबांचे जीवन फुलावे यासाठी प्रयत्न केले. हाच विचार आजही रयत शिक्षण संस्था करत आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी सनदी अधिकारी दळवी अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक शहाजी मखरे, प्रा. शरद साळवे यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी मानले.