नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी सर्व बॅंका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएम सेंटरमध्ये १०० तसेच २०० रुपयांच्या जास्त नोटा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून लोकांना लहान मूल्यांच्या नोटा चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील. सामान्य लोकांना गरज पडल्यास कमी मूल्याच्या नोटा सहज मिळाव्यात यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. यासाठी बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स (डब्ल्यूएलएओ) यांना हा बदल हळूहळू अंमलात आणण्यास सांगण्यात आले आहे.
या संदर्भात रिझर्व बँकेने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. नागरिकांना १०० आणि २०० रुपयांच्या पुरेशा नोटा एटीएम केंद्रात ठेवण्याबाबत सांगितले आहे. यासाठी बॅंका आणि व्हाइट लेबल एटीएम (WLA) ऑपरेटर्सना आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या निवेदनानुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत देशातील ७५ टक्के एटीएममधील एका कॅसेटमध्ये (पैसे ठेवण्यासाठी वापरला जाणारा बॉक्स) १०० तसेच २०० च्या नोटांची व्यवस्था केली जाईल. तर, ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ज्या नोटा प्रामुख्याने वापरल्या जातात, त्या नोटा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळेच एटीएम केंद्रातून नियमितपणे १०० आणि २०० रुपयांच्या नोटा मिळतील, याची काळजी संबंधितांना घेण्यास सांगण्यात आले आहे.
व्हाईट लेबल एटीएम म्हणजे काय?
व्हाईट लेबल एटीएम हे नियमित बँक एटीएमसारखेच काम करतात, परंतु ते बँकांद्वारे नव्हे तर खाजगी किंवा बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांद्वारे (एनबीएफसी) चालवले जातात. तुम्ही या एटीएममध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पैसे काढू शकता, तुमची शिल्लक तपासू शकता आणि बँक एटीएममध्ये तुम्हाला सामान्यतः मिळणाऱ्या सर्व सेवा वापरू शकता. या निर्णयामुळे लहान चलनी नोटा अधिक सहज उपलब्ध होतील आणि देशभरातील एटीएम वापरकर्त्यांसाठी सोयीसुविधा वाढतील अशी अपेक्षा आहे.
१ मे पासून एटीएम व्यवहार महागणार
१ मे पासून एटीएम मधून पैसे काढणे महागणार आहे. कोणत्याही एटीएम सेंटरमधून काही व्यवहार मोफत असतात. परंतू, १ मे पासून आरबीआयने मंजूर केलेल्या आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने सुचवलेल्या बदलानुसार दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रति व्यवहार १९ रुपये शुल्क आकारले जाईल. बॅलन्स चेक फी ७ रुपयांपर्यंत जाईल. या बदलाचा परिणाम अशा ग्राहकांना होतो जे त्यांच्या स्वतःच्या बँकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या एटीएम व्यतिरिक्त इतर एटीएमवर अवलंबून असतात, त्यामुळे जास्त शुल्क टाळण्यासाठी एटीएम वापराचे काळजीपूर्वक नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा