मुंबई | Mumbai
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सुरु केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफच्या आक्रमक अंमलबजावणीमुळे भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांपूर्वी हाहाकार उडाला होता. यानंतर काल शेअर बाजार स्थिर असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) पतधोरण समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेत देशातील कोट्यावधी लोकांना मोठा दिलासा दिला आहे.
रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (Repo Rate) ०.२५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट (Repo Rate) आता ६ टक्के झाला आहे. यामुळे आता कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात महागाई दर ३.६१ टक्क्यांवर घसरला होता. तर हाच दर जानेवारी महिन्यात ४.२६ टक्के इतका होता. त्यामुळे रेपो रेटमध्ये कपात होईल, अशी अपेक्षा होती. आता ही अपेक्षा खरी ठरल्याने सामान्य गुंतवणुकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आगामी काळात बँकांकडून गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो रेट कमी केल्याने बँकाकडून कर्जांवरील व्याजदरात कपात करण्यासाठीचा दबाव वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे याचा फायदा गृहकर्ज (Home Loan) आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या सामान्यांना होऊ शकतो.
रेपो दर १० वेळा कायम
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक यापूर्वी ४ ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान जैसलमेर येथे झाली होती. यावेळी दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय ४ विरुद्ध २ या मताने घेण्यात आला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचे धोरण आतापर्यंत कायम ठेवले होते.