Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखवाचिता वाचिता वेचती विचारे

वाचिता वाचिता वेचती विचारे

युवा पिढी वाचत नाही आणि वाचनसंस्कृती खालावली आहे असे आक्षेप नेहमीच घेतले जातात. अलीकडच्या काळात हा ज्येष्ठांच्या काळजीचा विषय झाला आहे. साहित्य संमेलनांमध्ये सुद्धा या विषयावर परिसंवाद रंगतात. या मुद्यावर चर्चा सुरु झाली की, युवापिढी वाचतच नाही हे गृहित धरुन त्याचा दोष सरसकट मोबाईलसारख्या अत्याधुनिक संवाद साधनांना दिला जातो. काही अंशी तो खरा असूही शकेल. तथापि वाचनामुळे ज्ञान मिळते. विचारशक्तीला चालना मिळते. ‘साहित्य, संगीत, ललितकला आणि वैचारिक व वैज्ञानिक शास्त्रे याविषयी विचार करून, इतरांना विचार करायला लावणारी संस्कृती म्हणजे ‘वाचन-संस्कृती’असे समीक्षक डॉ. राजशेखर शिंदे म्हणतात. माणसाच्या, पर्यायाने समाजाच्या जडणघडणीत वाचन मोलाची भूमिका बजावते. परिस्थिती जितकी प्रतिकुल तितक्या परिस्थिती बदलाच्या संधी जास्त असतात असे म्हटले जाते. सुदैवाने वाचनसंस्कृतीचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. वाचन संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजवण्यासाठी संस्था आणि व्यक्तीसमूह पुढाकार घेत आहेत. वाचनाची आवड जोपासणारे आणि वाढवणारे असे उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. डोंबिवली येथे नुकताच पुस्तके आदानप्रदान उपक्रम पार पडला. वाचकांनी या उत्सवात शेकडो पुस्तकांचे आदानप्रदान केले. याविषयीचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले. पै फ्रेंडस लायब्ररी या सामाजिक संस्थेतर्फे हा उपक्रम 2017 सालापासून दरवर्षी राबवला जातो. या उपक्रमांतर्गत वाचक त्यांनी वाचलेली जुनी पुस्तके आणून देतात आणि त्याबदल्यात तेवढीच न वाचलेली पुस्तके घेऊन जातात. लोकांची वाचनाची सवय कमी झाली असे बोलले जात असले तरी अनेकांचा दिवस पुस्तकांचे एक पान वाचल्याशिवाय मावळत नाही हे ही खरे. पुस्तक एकदा वाचून झाले की, ते कपाटात ठेवले जाते. कारणानिमित्तानेच ते परत वाचले जाते. सातत्याने पुस्तके विकत घेणे सर्वांनाच शक्य असते असे नव्हे. पुस्तकांचे आदानप्रदान केले गेले तर विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होऊ शकतील. नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेंतर्गत पुस्तके वाचकांच्या घरापर्यंत नेली जातात. या योजनेने समुद्रसीमाही ओलांडल्या असून अनेक देशात योजनेचा विस्तार झाला आहे. लातूर शहरात ‘वाचन कट्टा’ चालवला जातो. लोकांनी त्या कट्ट्यावर येऊन तेथे ठेवलेली पुस्तके वाचावीत असा यामागचा उद्देश असल्याचे स्थानिक रोटरी क्लबच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. खटाव तालुक्यात जीवन इंगळे सायकलवर फिरते वाचनालय चालवतात. परिसरातील 14 गावांमध्ये हे वाचनालय चालवले जाते. जीवन इंगळे 64 वर्षांचे होते हे विशेष. युवापिढीमध्ये हातातील पुस्तकांची जागा मोबाईलमधील अ‍ॅप्सनी घेतली आहे. त्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मुले वाचतात. समाजमाध्यमांवरही वाचनाचे समुह चालतात. देशात डिजिटल लायब्ररी उभारण्याचे आणि सर्व शाळा त्याच्याशी जोडणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे. अशा उपक्रमांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असली तरी ते उपक्रम पुस्तकांचे माणसांंशी नाते जोडणारे आहेत.  अर्थात, मुलांना वाचते करणे ही फक्त सामाजिक कार्यकर्त्यांची किंवा संस्थांची जबाबदारी नाही. ते पालकांचेही काम आहे. पालकांच्या हातात पुस्तके दिसली तर मुलेही पुस्तकाला आपलेसे करतील. त्यांच्या मनात पुस्तकांविषयी आकर्षण निर्माण होऊ शकेल. वाचणारा समाज निर्माण झाला तर वाचनसंस्कृतीही रुजेल. हा आशावाद उपरोक्त उपक्रमांनी जागवला आहे. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या