Thursday, September 19, 2024
Homeनगरराज्यात आता महावाचन उत्सवाचे आयोजन

राज्यात आता महावाचन उत्सवाचे आयोजन

वाचन चळवळीला गती देण्यासाठी शासनाचा नवा उपक्रम

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

- Advertisement -

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन 2024-25 या वर्षात महावाचन उत्सव-2024 हा उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाची बक्षिसेही दिली जाणार आहेत. राज्यात वाचन चळवळीला गती देण्यासाठी शासनाने या नवोपक्रमाची घोषणा केली आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील तिसरी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग असणार आहे. यासाठी तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी असे गट असणार आहेत. या उत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना दिली जाणार आहे. हा उपक्रम 22 जुलै ते 30 ऑगस्ट, 2024 या कालावधीत महावाचन उत्सव-2024 पर्यंत राबविला जाणार आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई हे वेब पोर्टल विकसित करणार आहे. त्यावर राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणी करता येईल. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यीकांचे विविध साहित्य, कथा, कादंबर्‍या, आत्मचरित्रे इत्यादी साहित्याची निवड करुन वाचन करतील. सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखीत स्वरुपात महावाचन उत्सव-2024 च्या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी 150 ते 200 शब्दांची मर्यादा असेल.

सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाची व्हिडिओ/ऑडिओ क्लिपही पोर्टलवर अपलोड करतील. वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरविण्याची जबाबदारी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांची असेल. यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय/खासगी ग्रंथालयांची मदत घ्यावी. कार्यक्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यायची आहे. सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद हे काम पाहणार आहेत. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर अंमलबजावणीकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकार्‍यांची असेल.

परीक्षण व पारितोषिके
सदरच्या उपक्रमासाठी तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग व राज्य या स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांस पारितोषिके दिली जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राचा दर्जा स्वतंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखीत/व्हिडिओ/ऑडिओ क्लिप या स्वरुपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांची निवड तीन वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे केली जाणार आहे. पारितोषिकांचे स्वरुप काय असावे याचा निर्णय राज्य प्रकल्प संचालक घेणार आहेत.

अमिताभ बच्चन असतील ब्रँड अ‍ॅम्बेसिडर
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने महावाचन चळवळ सुरू केल्यानंतर या चळवळीच्या माध्यमातून राज्यात वाचन संस्कृती विकसित करण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचा विचार रूजला जावा. वाचनामुळे समृध्द नागरिक घडावा यादृष्टीने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. या उपक्रमाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून सिनेसृष्टीचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून विद्यार्थी खरेच वाचते होतात का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या