Saturday, November 16, 2024
Homeनगर39 लाखांच्या वसुलीचे मुख्याधिकार्‍यांचे आदेश

39 लाखांच्या वसुलीचे मुख्याधिकार्‍यांचे आदेश

राहात्यात खळबळ : स्वच्छता कंपनीने पालिकेकडून लाटली कामापेक्षा अधिक रक्कम

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता शहराचा पालिकेने स्वच्छतेचा ठेका दिलेल्या भाग्येश हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या कंपनीने कमी मनुष्यबळ असताना जास्तीचे काम केल्याचे दाखवून पालिकेची दिशाभूल करत केलेल्या कामापेक्षा जास्तीची लाखो रुपयांची रक्कम उकळली. ती 39 लाखांची रक्कम सदर कंपनीच्या अनामत रकमेतून अथवा उर्वरित बिलातून वसूल करण्याचा आदेश पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

राहाता पालिकेने शहराचा स्वच्छतेचा ठेका पुण्याच्या भाग्येश प्रा. लि. या कंपनीला दिला होता. सुरुवातीपासून ही कंपनी वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. या कंपनीमार्फत शहरातील कचरा विलगीकरण करणे, त्याची विल्हेवाट लावणे, गटारी व नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कंपनीवर होती. प्रत्येक घरातील कचरा गोळा करून ओला व सुका कचरा तो डंपींगमध्ये नेऊन त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंपनीची होती.

यासाठी कंपनीला सर्व अटी शर्तीचे पालन करणे आवश्यक होते. यासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कंपनीला पैसे मिळत होते. मात्र कंपनीने अवघ्या 43 मनुष्यबळावर हे काम आठ महिन्यांपासून करत होती. त्यातील सफाईसाठी तसेच घंटागाडी व गटारी सफाईसाठी अतिशय कमी मनुष्यबळ कंपनी वापरत असे. मात्र कागदोपत्री अधिक काम केल्याचे दाखवून पालिकेची फसवणूक करून अधिक बिल सादर करून पालिकेकडून कंपनी अधिक पैसे उकळत होती.

कंपनीच्या कामाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असताना त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. याप्रश्नी अनेकवेळा नगरसेवक व नागरिकांनी आंदोलने केली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी केली असता कंपनी प्रत्यक्ष काम न करता तसेच ओला व सुका कचर्‍याचे विलगीकरण न करता थेट नागरिकांच्या घरोघर न जाता ज्या ठिकाणी कधी गेलेच नाही, अशा जंगल प्रभागातील घरातील कचरा उचलल्याचे दाखवून अधिकची बिले सादर करून पालिकेची फसवणूक केली.

घनकचरा डेपोची काळजी घेतली नाही. रोजचे लॉग बुक लिहिले नाही. रोज कुठे व किती कर्मचार्‍यांमार्फत काम केले याची माहिती नाही. तसेच पालिकेच्या मालकीची वाहने वापरली. मात्र त्याचे भाडे दिले नाही. तसेच कोणतीही यंत्रसामुग्री न वापरता केवळ मनुष्यबळाचाच वापर करून चुकीचे मोजमाप दाखवून जादा पैसे कंपनीने उकळले. या सर्व प्रकाराची पालिका अधिकार्‍यामार्फत चौकशी केली असता कंपनीचा सर्व बोगस प्रकार समोर आला.

कंपनीने पालिकेकडून महिन्याला 8 लाखांहून अधिक रक्कम वसूल केली. मार्च 19 ते 19 ऑक्टोबर 2019 या आठ महिन्यांच्या काळात कंपनीने जादा बिले देऊन 66 लाखांची रक्कमेचे बिल अदा करून घेतले. मात्र ते अदा करताना कोणतेही पुरावे जोडले गेले नाही. अशा सर्व प्रकाराची माहिती घेतली असता 39 लाख रुपये कंपनीने पालिकेकडून जादा उकळले असून ते संबंधित कंपनीकडून कंपनीच्या सुरक्षा अनामत रक्कमेतून अथवा उर्वरित बिलातून वसूल करण्यात यावे, असा आदेश मुख्याधिकारी यांनी देत याप्रकरणी पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार असून त्यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.

केलेल्या करारानुसार कंपनी काम करत नाही म्हणून सदर कंपनीचा ठेका मागील मुख्याधिकारी यांनी रद्द केला होता. त्या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा व लाचेची मागणी करणे प्रकरणी एका मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर ही कारवाई करणारे राहात्याचे मुख्याधिकारी गावीत यांना रजेवर पाठविण्यात आले होते. या प्रकरणी एका मंत्र्याने हस्तक्षेप करत सर्व नियम धाब्यावर बसवून हा ठेका पुन्हा त्याच कंपनीला देण्यात आला होता. याच कंपनीच्या मालकाचे पालिकेत असलेला पाणी पुरवठ्याचा ठेकाही रद्द करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या