अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या व्यापामुळे महसूल विभागाला महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे लक्ष देता आले नाही. परिणामी शेतजमिनीच्या 43 कोटींच्या महसुलाच्या उद्दिष्टापैकी सध्या 33 कोटी 56 लाखांचे उद्दिष्ट (80 टक्के) पूर्ण झालेले आहे. दरम्यान, निवडणुका झाल्याने महसूल विभागाने उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरवले आहे. महिनाभरात त्यांना उर्वरित सुमारे 10 कोटी वसूल करण्याचे आव्हान आहे. मार्चअखेर हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
शेतजमीन महसूल, अनधिकृत बिगरशेती, गौण खनिज, करमणूक कर या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनाने जिल्ह्याला जमीन महसुलातून 43 कोटी 31 लाखांचे उद्दिष्ट दिले आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. या निवडणुकीसाठी अधिकारी – कर्मचार्यांना वेगवेगळे प्रशिक्षण, आचारसंहिता कालावधीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर कारवाई, सभा, मिरवणुकांसाठी परवानगी देणे आदी कामे होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यापासून मतमोजणीपर्यंत प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी महसूल विभागाकडेच होती.
त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकांच्या काळात तीन महिने कालावधी महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांचा गेला आहे. वर्षातील सहा महिने हे निवडणुकीच्या कामकाजात गेल्याने जिल्ह्याचे महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यास फारसा वेळ मिळाला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागल्यानंतर महसूल उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शेतजमीन 43 कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट आहे. सध्या 33 कोटी 56 लाखांचे उद्दिष्ट (80 टक्के) पूर्ण झालेले आहे. दरम्यान, आर्थिक वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे महसूल उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करता आले नव्हते. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मार्चअखेर विशेष मोहीम राबवून हे लक्ष पूर्ण केले जाईल, असे महसूल विभागाचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.
तालुकानिहाय महसूल वसुली, कंसात टक्केवारी
अहिल्यानगर 7 कोटी 49 लाख (87.54), नेवासा 2 कोटी 23 लाख (69.76), श्रीगोंदा 2 कोटी 32 लाख (109. 83), पारनेर 2 कोटी 4 लाख (86.50), पाथर्डी 83 लाख (52.83), शेवगाव 97 लाख (69.94), कर्जत 1 कोटी 70 लाख (71.63), जामखेड 1 कोटी 56 लाख (88. 63), संगमनेर 3 कोटी 6 लाख (56.9), अकोले 91 लाख (93.83), श्रीरामपूर 1 कोटी 94 लाख (59.90), राहुरी 1 कोटी 44 लाख (56.11), राहाता 3 कोटी 63 लाख (101. 11), कोपरगाव 3 कोटी 39 लाख (109.39).