Wednesday, July 24, 2024
Homeशब्दगंधबुध्दत्वातील अलौकिकता एक सूक्ष्मावलोकन

बुध्दत्वातील अलौकिकता एक सूक्ष्मावलोकन

– जयसिंग वाघ

- Advertisement -

सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर लागलीच बुद्धवचन बोधांचे कंठस्थ संगायन करुन त्रिपिटक तयार केले गेले. मात्र काहीच वर्षात त्याविषयी भारतभरात त्यांच्या वचनांचे विपरीत अर्थ लावून एकतर बुद्धाला बदनाम स्वरुपात जनतेवर बिंबविणे वा जनमानस लक्षात घेवून त्याप्रमाणे बुद्ध मांडणे हे प्रकार सुरु झाले. पुढे शुद्ध स्वरुपातील बुद्ध मांडण्याचे अनेक संशोधनात्मक लिखाण लिहिले गेले.

याचसंदर्भात सम्राट अशोकाने तिसरी धम्म संगीती भरवून अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने बुद्धवचनबोध शुद्ध स्वरुपात मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. असे असले तरी भारतातून बौद्ध धर्म हद्दपार झाल्यानंतर पुनः बुद्द विचारांचे विकृतिकरण सुरुच झाले हे काम हजारो वर्षे चालूच राहिले त्यामुळे ते सत्यच आहे, असे बुद्धानुयायांना वाटू लागले. पुनःसंशोधनात्मक लिखाण होऊन त्याचे शुद्धीकरण होत आहे.

बौद्ध साहित्याचे अभ्यासक अ.भी.मोरे यांनी ‘बुद्धत्वातील अलौकिकता’ या पुस्तकाच्या माध्यमातून बुद्धाला प्रतिगामी व पुरोगामी कसे मांडले गेले याविषयीचे बौद्ध साहित्यातील काही संदर्भ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखक एक पुरोगामी विचारांचे असल्याने ते बुद्ध, धम्म, संघविषयक आलेले चमत्कार, अलौकिकता नाकारतात. चमत्कार, अलौकिकता, देव, देवता, अवतार, दैवीशक्ती याबाबी मानणे म्हणजे ‘अधम्म’ होय व अधम्माचा धम्मात प्रवेश हा बुद्धत्वाचा विपर्यास आहे, असे ते स्पष्टपणे नमूद करतात. गौतम बुद्ध यांचे झालेले दैवतीकरण व बुद्ध देव नसून महापुरुष आहेत यासंदर्भाने बौद्ध साहित्यात आलेल्या अनेक गाथा, वचनबोध, संवाद यांचा ते यात समावेश करतात व तसे स्वतंत्र दोन भाग करतात. पुस्तकाच्या पूर्वार्धात लिहितात की, राजपुत्र असणारे गौतम बुद्ध बुद्धत्वानंतर अंग झाकण्याकरिता चीवर, चीवर शिवण्याकरीता सुई-दोरा, दाढी व डोक्याचे केस मुंडण करण्याकरिता वस्तरा, जेवण ठेवण्याकरिता भिक्षापात्र, पिण्याचे पाणी गाळण्याकरिता कापड एवढ्याच वस्तु सोबत ठेऊन सलग 45 वर्षे पाई भ्रमण करुन ते धम्माचा प्रचार करतात. या 45 वर्षात त्यांनी 82000 बुद्धत्व बोध (वचन/सूत्र) व 2000 बुद्धत्व बोध बौद्ध भिक्खु, भिक्खुणी यांनी सांगितले व हे सर्व बुद्ध यांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर घेण्यात आलेल्या पहिल्या धम्मसंगतीत तयार करण्यात आलेल्या सुत्तपिटक, विनयपिटक, अधिधम्मपिटक यात संग्रहित करण्यात आले असे नमूद करतात. बुद्ध विचारधारेत या पहिल्या संगीतीला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे तेवढेच अनन्यसाधारण महत्त्व सम्राट अशोक याने घेतलेल्या तिसर्‍या धम्मसंगीतीस आहे. बौद्ध धर्म शुद्ध स्वरुपात मांडण्याचे शास्त्रशुद्ध काम सम्राट अशोकाने केले आहे व त्यानेच विविध देशांमध्ये तो पोहोचविला आहे. अनेक स्तूप बांधून, शिलालेख तयार करुन त्याचे जतन केले आहे. लेखक मोरे यांनी अलौकिकतेबाबत श्रावस्ती येथील जेतवनात ‘पूर्वजन्म’विषयी गौतम बुद्ध यांनी जे प्रवचन दिले त्याचा संदर्भ देतात. यात बुद्ध असे म्हणतात की, माझ्या आधी सहा बुद्ध जन्माला आलेत मी सातवा बुद्ध आहे, त्यांचे आयुष्य प्रत्येकी 80000, 70000, 60000, 40000, 30000, 20000 वर्ष असे असून माझे आयुष्य 100 वर्षे पेक्षा कमी आहे. यातील तीन बुद्ध ब्राह्मण व चार बुद्ध क्षत्रिय वर्णात जन्मले आहे. पहिला बुद्ध 31 कल्प (अंदाजे 1 कोटी वर्ष) आधी जन्माला आला त्या परंपरेतील मी 7वा बुद्ध आहे. लेखकाने पुढे सुत्तपिटकचा आधार देत त्यात एकूण 28 बुद्ध होऊन गेल्याचे व सिद्धार्थ गौतम 29वे बुद्ध असल्याचे दाखविले आहे. भूत, वर्तमान व भविष्य काळातील बुद्ध आम्हाला वंदनीय असल्याची गाथा जी आजही म्हटली जाते ती म्हणजे…

ये च बुद्धा अतिताच, ये च बुद्धा अनागता, पचुपन्नाच ये बुद्धा

अहं वंदामी सब्बदा….. होय . या व इतर अनेक मुद्दे ते यासंदर्भाने मांडतात. लेखक अशाप्रकारच्या लिखाणास, बुद्धत्वाला वैदिक ब्राह्मणी स्वरुप देण्याचा प्रकार मानून ‘अधम्माची धम्मात होत असलेली भेसळ’ असे वर्णन करतात. व पुस्तकाच्या दुसर्‍या भागात वस्तुनिष्ठ, धम्मनिष्ठ, शुद्ध स्वरुपाचे आलेले संदर्भ देतात. बुद्धत्व म्हणजे जादू, चमत्कार, दिव्यशक्ती, अलौकिकता नाही याविषयी खुद्द गौतम बुद्ध यांनी केलेला उपदेश ते मांडतात. त्याचबरोबर सुत्तपिटक, दीघनिकाय, विनयपिटक, खुद्दकनिकाय, जातक कथा, मज्जिमनिकाय या व अन्य काही ऐतिहासिक बौद्ध ग्रंथांमधील संदर्भ देतात. अलौकिक, दिव्यशक्तीच्या खरेपणाविषयी जे-जे साधू, महंत दावा करत प्रसंगी हे सर्व सिद्ध करुन दाखविण्याची भाषा करत त्या साधू, महंत यांचे आव्हान बुद्ध स्वीकारत असत व हे सर्व साफ खोटे आहे हे सिद्ध करीत असत. एकही साधू, महंत बुद्धाला सामोरे गेले नाही याबाबतचे संदर्भही ते देतात. इंद्र , ब्रह्म, यक्ष, मार या ब्राह्मणी देव-देवता असून त्या काल्पनिक आहेत याबाबत भिक्खु कुमार कश्यप व प्रसेनजित राजा यांचेतील प्रश्नोत्तरे ते देतात. बुद्ध यांना आई, वडील असल्याने, त्यांनी मातेपोटी जन्म घेतला असल्याने ते अवतारी पुरुष वा प्रकट झालेले पुरुष ठरत नाही असेही ते मांडतात. मी कोणी अलौकिक नाही तर तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे! हे खुद्द गौतम बुद्ध यांनी केलेले विधान ते सविस्तरपणे मांडतात. बौद्ध धर्माचा चिकित्सकपणे अभ्यास करणार्‍या वाचकास सदर पुस्तक नक्कीच मार्दर्शक ठरेल.

– ‘प्रशिक’ , अजिंठा हाउसिंग सोसायटी

अजिंठा चौक , जळगाव.

- Advertisment -

ताज्या बातम्या