जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या 12व्या जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. मिलिंद बागुल, स्वागताध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. डी. पाटील, उपस्थित मान्यवर आणि साहित्यप्रेमी बंधू भगिनींनो.!
मित्रांनो, मी बालकवींच्या जन्मभूमीतून, म्हणजे धरणगावाहून आलो आहे. त्यामुळे माझ्यावर बालकवींच्या उत्तुंग साहित्य प्रतिभेचा प्रभाव असणारच. शिवाय माझं महाविद्यालयीन शिक्षण प. पू. साने गुरुजींच्या पावनभूमीत, अमळनेर येथे, त्यांच्याच प्रताप महाविद्यालयात झाले आहे. पू. गुरुजी ज्या वसतिगृहात राहत होते, त्या आनंद-भुवनमध्ये राहण्याचे भाग्यही मला लाभले. तेथील पवित्र संस्कारही माझ्या मनावर झाले असतील, तर नवल नाही. माझे आई-वडील आणि माझे शिक्षक गोविंदानुज तथा गो. गं. वाजपेयी यांनी माझ्यावर वाचनाचा संस्कार रुजवला. वाचन म्हणजे मनाची मशागतच.
वाचन म्हणजे सुपीक मनावरची पेरणीच. या पेरणीतून सहज भावनेने, माझ्या लेखणीतून लेखनाचं पीक अंकरु लागलं. माझे मित्र डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी या अंकुरण्याला जोजलं, जोपासलं; प्रोत्साहित केलं आणि माझ्यातल्या साहित्यिकाने बाळसं धरलं. विज्ञानाचा विद्यार्थी, शिक्षक असतानाही मी कथा, कविता, अभंग, गझल, समिक्षा लेखनात रमू लागलो; घडू लागलो. महाराष्ट्रातील बहुसंख्य दैनिकं, त्यांच्या साहित्य पुरवण्या, नियतकालिकं, मासिकं, दिवाळी अंक, सभा, संमेलनं, आकाशवाणी, दूरदर्शनवर हजेरी लावत, साहित्य यात्रेचा नम्र वारकरी झालो. यामुळे साहित्याचा एक विद्यार्थी म्हणून, मला अभ्यास, चिंतन करता आले. आजही करत आहे. सभा, संमेलनं, चर्चासत्रातून व्यक्त होता आले. त्या वाटचालीचाच एक टप्पा म्हणून, आज मी तुमच्यासमोर, एका जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून उभा आहे. माझ्या आजवरच्या वाटचालीतून अनुभवलेलं साहित्यविषयक चिंतन, मी आज आपल्यासमोर मांडत आहे.
माणूसपण जपणारं साहित्य हवं
मित्रांनो, सध्या देशच नव्हे तर सारे विश्व एका अनाकलनीय अशा भविष्याकडे वाटचाल करीत आहे. देशा-देशात, समाजा-समाजात, जाती-धर्मात, माणसा-माणसात खोल दरी निर्माण होत आहे. सर्वत्र अविश्वास, अशांती आणि अस्थिरता वाढीस लागली आहे. प्रत्येक माणूस दुसर्याकडे संशयाने, अविश्वासाने पाहत आहे. समाजात द्वेष, स्वार्थ, अनैतिकता उफाळून वर येताहेत. जणू त्यांच्यावर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. सामाजिक स्थिती चिंतनीय झाली आहे. माणूसपण संपायला आलं आहे. शांती लोप पावली असून, संस्कृतीच नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. हे सर्व थोपवण्याचं, थांबवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यात आहे. म्हणून नव्या शतकातील साहित्य, हे मानवी भावभावनांना, माणूसपणाला जपणारं, समृध्द आणि आंतरिक ओलावा स्त्रवणारं, असं हवं आहे. सकल विश्वासाठी बंधुत्वाचं पसायदान मागणा-या माऊलींच्या देशात, अशी सकारात्मकता पेरणारं साहित्यच सहजीवनाचं बळ निर्माण करेल, असं माझं ठाम मत आहे. आपण प्रत्येकजण व्यक्तीगत शांतीसाठी, सतत प्रयत्नरत असलो, तरी ती शांती सामूहिक शांतीत रुपांतरित झाल्याशिवाय, सामाजिक शांती येणार नाही व देशाला स्थैर्य प्राप्त होणार नाही.
स्थानिक संमेलनाची चळवळ व्हावी
यासाठी तालुका, जिल्हा स्तरांवर होणारी साहित्य संमेलनं, मोलाची भूमिका बजावू शकतात. म्हणूनच, आज जामनेर येथे होत असलेल्या या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाला, एक वेगळंच महत्त्व आहे. अशी तालुका, जिल्हास्तरीय संमेलनं, स्थानिक पातळीवरील लेखक – वाचक यांच्यातील नातं दृढ करण्याचं, एक प्रभावी माध्यम ठरणार आहेत. राज्यस्तरीय, अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये संधी मिळणं ही अभिमानाची आणि अभिनंदनीय बाब असली, तरी तेथे पोहोचण्यासाठी एक मर्यादा आहे. स्वत्व जपणारे, कुणाचे लांगुलचालन न करणारे, गुणी साहित्यिक तिथपर्यंत पोहोचतीलच, याची खात्री नाही. काहींना ते भाग्य लाभतंही, परंतु, ती संख्या खूप कमी आहे. तेथेही गट-तटाचे राजकारण आहे, आपापल्या गोतावळ्यांची, कंपुगिरीची लागण आहे. अशावेळी नकारात्मकतेचा सूर आळवण्यापेक्षा, सकारात्मकतेचं एखादं दमदार पाऊल, अशा संमेलनांना पर्याय ठरु शकते. तेच काम आपले मंडळ करत आहे. अशा संमेलनाची चळवळ सुरु झाली पाहिजे. जिल्हा, तालुका, गाव पातळीवर नियमित छोटेखानी संमेलन व्हायला हवीत. गावातील शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना लिहितं-वाचतं करण्यासाठी स्थानिक मेळावे घ्यायला हवेत. लेखन वाचनाचा हा संस्कार बालपणीच झाला, तर साहित्य चळवळीला चांगले दिवस येतील.
बोलीचा जागर व्हावा
अशा संमेलनांमधून आपल्या स्थानिक बोलीभाषांचाही जागर करता येईल. बोलीला स्वतंत्र व्यासपीठ मिळेल. मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल, तर प्रादेशिक बोली जिवंत राहायला हवी. त्यासाठी बोलीभाषेतून बोलणं, लिहिणं नियमित झालं पाहिजे. बोलीतील शब्द, वाक्प्रचार, म्हणी म्हणजे बोलीचं सौंदर्य, श्रीमंती. त्यांचा वारंवार वापर झाला, म्हणजे ते चलनात राहतील. दुसर्या पिढीकडे सहज हस्तांतरित होतील. जपले जातील. जिवंत राहतील. आपल्या जिल्ह्यात प्रामुख्याने आहिरानी, लेवा गणबोली, तावडी, गुजर, भिलाऊ, पावरा या बोली बोलल्या जातात. या संदर्भात बोलींची स्वतंत्र संमेलनंही होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
आहिरानी बोलीचं नुकतंच दुसरं विश्व संमेलनंही संपन्न झालंय. मात्र, बोलीचा उपयोग, हा फक्त संमेलनापुरता उत्सवी स्वरुपात न राहता, ती प्रत्यक्षात घराघरात बोलली गेली पाहिजे. बोलीतून मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती व्हायला हवी. तीचा अभ्यासक्रमात सहभाग वाढायला हवा. आपली बोली आपला अभिमान हे अभियान, व्यापक स्तरावर राबवायला हवं. जे बोलीभाषेसह, आपली मातृभाषाही समृध्द करेल.
मित्रांनो, सध्या समाज माध्यमांवर लिहित्या हातांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झालेली आहे. नवं व्यासपीठ मिळालं आहे. ते तत्काळ, सहज आणि सुलभपणे उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना संमेलनाची, बैठकांच्या निमंत्रणाचा वाट पाहावी लागत नाही. येथे व्यक्त होणार्यांची संख्याही खूप वाढली आहे. यातून नवनवीन विचार, साहित्य प्रवाह सामायिक होत आहेत. परंतु, यातील सकस किती आणि निकस किती.? हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. वरवर ही वृध्दी वाटत असेलही.
परंतु, ही वाढ सुदृढ नसून, ती सूज आहे, असं खेदाने नमूद करावं लागतं. कारण, समाज माध्यमांवर फिरणार्या साहित्यात, उचलेगिरी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. असं करुन कुणाचंही साहित्य, कुणाच्याही नावावर, उजळ माथ्यानं, बिनधास्त फिरत राहतं. साहित्य चौर्याचं प्रमाण यातून वाढीस लागलं आहे. हे समाधानकर निश्चितच नाहीये. याला जबाबदार आहे, लघुमार्ग संस्कृती. विनाश्रम फलप्राप्तीची वृत्ती. याला कारणीभूत झालंय, ते कमी झालेलं वाचन.
वाचन संस्कृती जपायला हवी
वाचनाची एक समृध्द अशी संस्कृती आहे. वाचन हा एक संस्कार आहे. वाचनाशिवाय खरा साहित्यिक घडणं शक्यच नाही. साहित्य म्हणजे अनुभवांना व्यक्त करणं. परंतु, ते व्यक्त करण्यासाठी शब्दांची श्रीमंती, भावभावनांचं समृध्दपण, सभोवतालचे दाखले, आवश्यक असतात. जे वाचनातून मिळतात. वाचन, श्रवण म्हणजे लेखन आणि वक्तृत्वासाठीची पेरणी असते. ही पेरणी जितकी सकस, निर्मल होईल, तितकं साहित्याचं, विचारांचं पीक जोमदार येईल. मात्र, दुसर्याचं लिहिलेलं वाचणं किंवा ऐकणं आपण सोईस्कर टाळायला लागलो आहोत. विसरुन चाललोयत. ही शोकांतिकाच आहे. वाचन हे अध्ययन, ज्ञानग्रहण आणि मनोरंजनाचं प्रभावी माध्यम आहे. वाचनाने व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. वाचन हा एक संस्कार असून, तो बालपणीच लागायला हवा.
विद्यार्थी शाळेत जाण्यापूर्वी पालकांनी त्याच्या हातात छान छान चित्रांची, गोष्टींची, गाण्यांची, चरित्रांची पुस्तकं द्यायला हवीत. जी त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करतील. त्यासाठी अशी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय साहित्य संमेलनं, उपयुक्त ठरु शकतील. एखादं पुस्तक अथवा पुस्तकाचं एखादं पानही, वाचकाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. त्याला त्यात त्याचं ध्येय सापडू शकतं. नवी प्रेरणा मिळू शकते. पुस्तक हे एका निस्वार्थ मित्राची भूमिका पार पाडत असते. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही, असं यासाठीच म्हटलं जातं. पुस्तकांपर्यंत वाचक पोहोचत नसेल, तर पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचतील, असे उपक्रम वाढायला हवेत. लहान मुलांनी पुस्तकं हाताळायला हवीत. त्यांचा सुगंध घ्यायला हवा. वाचायला हवीत. ती भूमिका अशा संमेलनांनी पार पाडायला हवी, अशी अपेक्षा मी यानिमित्ताने व्यक्त करतो.
समाजातील आदर्श साहित्यात यावेत
साहित्य हे वरवर मनोरंजन करत असलं तरी ते डोलकाठी सारख असतं. मनोरंजनाच्या एका टोकाला ज्ञान तर दुसर्या टोकाला प्रबोधनाची योजना केलेली असते. ज्या साहित्यात हा त्रिवेणी संगम साधला जातो, असं साहित्य समाजात स्वीकार्य होतं. साहित्याने माणूस-माणूस जोडला गेला पाहिजे. साहित्याने समाज जोडला पाहिजे. जे साहित्य समाजा-समाजात, जाती, धर्मात विद्वेष पसरवत असेल, मनभेदाच्या भिंती उभ्या करत असेल, त्याला साहित्य तरी कसे म्हणावे. साहित्याने समकालावर, परिस्थितीवर निर्भय होऊन बोललं पाहिजे. साहित्य हा समाज मनाचा आरसा असतो. ते लेखक, कवींनी आपल्या रचनांमधून वेळोवेळी सिद्ध केलं पाहिजे. साहित्याने निव्वळ मनोरंजन न करता, समाजाचं वास्तव प्रखरपणे मांडायला हवे. साहित्याचा सत्ताधारी, राजकारणी, प्रशासनावर वचक असायला हवा. लिहित्या हातांनी सजगतेची आणि जागलेपणाची भूमिका बजावायला हवी. तरच, साहित्य आणि समाज यांच्यातला समन्वय दृढ होईल.
साहित्याबद्दल आपलेपणा निर्माण होईल. साहित्य वाचनाची ऊर्मी निर्माण होईल. आजचा सुशिक्षित तरुण, बेकारीने सैरभैर, दिशाहीन झाला आहे. त्याच्यासमोर आदर्श म्हणून वावरणारे नेते, पुढारी यांचे हातच नव्हे, तर तन, मनही भ्रष्ट आचार विचारांनी बरबटलेले आहेत. यातून समाजात निराशा आली आहे. आदर्श म्हणून कुणाकडे पाहावे, ही सार्वत्रिक समस्या झाली आहे. समाजातले आदर्श साहित्यिकांनी लेखनात आणायला हवेत.
या उलट, आपण आदर्श निर्माण करण्याऐवजी लांगुलचालन करणार्या पाठीराख्यांची फौज निर्माण करण्यात धन्यता मानत आहोत. असे अंध पाठीराखे, भक्त, शिष्यच पुढे त्यांच्या श्रध्दास्थानांच्या स्वप्नांचे इमले ढासळायला हातभार लावतात. अशा पाठीराख्यांना योग्य वाट दाखवायला, सकस साहित्य असेल आणि त्याचा ते सदुपयोग करतील, तर विचारांची दिशा बदलू शकते. साहित्यिकाने लेखन धर्म पाळावा – ज्या देशात लेखक, कवी, विचारवंत मुक्ततेचा श्वास घेतो, स्वतंत्रपणे लिहू शकतो आणि निर्भीडपणे आपले विचार मांडू शकतो, तो देश निकोप आणि स्वतंत्र असतो. अशा देशात लोकशाही सुख-समाधानाने नांदते आणि जनता सुखी असते.
असाच देश प्रगती करतो, विकासाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करतो आणि विश्वात आदर्श ठरतो. म्हणूनच साहित्यिकांची जबाबदारी खूप मोठी असते. लेखक, कवी, विचारवंत यांनी कुणाचे हुजरे, बटीक न होता आपला लेखन धर्म पाळायला हवा. वास्तवाशी इमान, इतिहासाशी प्रामाणिक आणि भविष्याचा अचूक वेध घेण्याचं सामर्थ्य ज्यांच्या लेखणीत असेल असेच साहित्यिक व त्यांचे साहित्य काळाच्या कसोटीवर खरे उतरेल. आपली स्वतःची छाप सोडेल व अजरामर होईल. असेच साहित्य समाजाला जगवेल, जगण्याचं बळ देईल. संस्कृतीचं रक्षण करेल आणि अमृताशी पैजा जिंकेल. साहित्य, संस्कार आणि संस्कृती यांचा सुंदर मेळ म्हणजे समाजमनाचा आरसाच असतो. त्यातूनच समाजाचं खरं प्रतिबिंब दिसत असतं. हे प्रतिबिंब निर्मळ असावं असंच प्रत्येकाला वाटायला हवे. जळगाव जिल्ह्यात ही परंपरा पिढ्या न् पिढ्या सुरुच आहे. त्या समृध्द परंपरेची ओझरती ओळख करुन देणं, मी माझं कर्तव्य समजतो.
जिल्ह्याची समृध्द साहित्य परंपरा
खान्देशातील जळगाव जिल्ह्याची काळी कसदार भूमी केळी, कापूस आणि कवितेसाठी अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. येथल्या तापी, अंजनी, बोरी, गिरणाच्या सुपीक काठांवर साहित्य, संस्कार आणि संस्कृतीचं पीकही जोमदार आलं आहे. जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक समृध्द वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत बालकवी, बहिणाबाई, दु. आ. तिवारी, काव्यरत्नावलीकार नानासाहेब फडणवीस, त्र्यंबक सपकाळे, राजा महाजन, धो. वे. जोगी, के. नारखेडेंसारखी काव्यरत्ने जन्माला आली. पू. साने गुरुजी, केशवसूत, बा.सी.मर्ढेकरांनी या भूमिला आपली कर्मभूमी बनवली.
या शब्दप्रभूंनी आपल्या साहित्यसेवेने येथे कथा, कविता, गीतं, कादंबर्यांची बाग फुलवली. येथील शब्दफुलांनी अवघा महाराष्ट्र दरवळून गेला. धुंद झाला. ह्याला पाठबळ होते ते प्राचीन समृध्द वारश्याचे. हेच संचित घेऊन वर्तमानातही भालचंद्र नेमाडे, ना. धो. महानोर, अशोक कोतवाल, डॉ. संजीवकुमार सोनवणे ते अशोक कोळी यांनी त्यावर कीर्तिध्वज लावले. यापुढेही अनेकजण आपली यशस्वी वाट निर्माण करत आहे. अधिक समृध्द करीत आहे.
– ‘देवरुप’, नेताजी रोड.
धरणगाव, जि.जळगाव. 425105.