नाशिक । प्रतिनिधी
बांधकाम कामगारांच्या नोंदणीनंतरही त्यांना जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याने कामगारांमध्ये कमालीची नाराजी असून त्यांनी बुधवारी थेट ‘देशदूत’ कार्यालय गाठत आपली व्यथा मांडली. यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचा संवाद कामगार उपायुक्तांशी ‘देशदूत’ने करून दिला.
बांधकाम कामगारांच्या नोंदणीनंतर त्यांना दिले जाणारे जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याने नाशिकच्या शरद पवार डाळिंब मार्केटच्या आवारात हजारो नोंदीत बांधकाम कामगारांनी तीन दिवसांपासून ठिय्या मांडला होता. मात्र त्यांना न्याय मिळत नसून लोकांकडून पैसे घेऊन त्यांना किट वाटप केले जात असल्याची तक्रार या कामगारांकडून केली जात होती.
या पार्श्वभूमीवर काही कामगारांनी ‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही व्यथा मांडली. यावेळी डॉ. बालाजीवाले यांनी लगेचच त्यांचे सर्व प्रश्न समजावून घेत कामगार उपायुक्त विकास माळी यांच्याशी त्यांचा भ्रमणध्वनीद्वारे संवाद घडवून आणला. कामगार उपायुक्तांनी मांडलेल्या भूमिकेनुसार बांधकाम कामगारांच्या नोंदणीनुसार मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत असल्याने वाटपात अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले. नजिकच्या काळात हा तुटवडा संपवण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. तालुका स्तरावरूनसुद्धा वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे. मागणी मोठी असून लवकरच ती पूर्ण केली जाणार असल्याचे उपायुक्त माळी यांनी यावेळी कामगारांशी बोलताना सांगितले.
कामगारांच्या नोंदणीचे तातडीने नूतनीकरण करण्यात यावे, सर्व कामगारांना तातडीने किट वाटप करण्यात यावे, वाटपात हस्तक्षेप करून भ्रष्टाचार करणार्या एजंटांचा बंदोबस्त करण्यात यावा इत्यादींसह विविध मागण्या कामगार उपायुक्तांकडे यावेळी मांडण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रीय विश्वगामी बांधकाम कामगार संघाच्या वतीने संतोष निकम, प्रवीण बोरसे, ज्ञानेश्वर वारडे, संतोष सोमासे, गणेश अहिरे, रवींद्र सुरासे आदींसह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
नोंदणीसह किट देण्यासाठी अथवा नूतनीकरण करून देण्यासाठी कोणीही पैसे घेत असल्यास त्याची तक्रार कामगार उपायुक्त कार्यालयाकडे करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.
विकास माळी, कामगार उपायुक्त