मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास मान्यता देण्यात आली आहे. या गणवेशात टोपी निळ्या रंगाची असून त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाची मुद्रा आणि नाव असणार आहे. कामगार दिनाचे औचित्य साधून या नव्या खाकी गणवेशाची अंमलबजावणी १ मे २०२५ पासून राज्यभरात करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मंगळवारी दिली.
महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या खाकी रंगाच्या गणवेशाचे प्रातिनिधिक वाटप आज मंत्री फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुरक्षा रक्षकांच्या गणेशाच्या रंग खाकी असावा, अशी मागणी विविध संघटना आणि सुरक्षारक्षकांनी राज्य सरकारकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरातील जिल्हानिहाय १६ सुरक्षा रक्षक मंडळातील कर्मचारी गुरुवारपासून मे पासून खाकी गणवेशात दिसणार आहेत.
खाकी रंगाच्या नव्या गणवेशामुळे सुरक्षा रक्षकांची ओळख एकसंध राहील आणि त्यांच्या शिस्तबद्धतेत भर पडेल. तसेच या नव्या गणवेशामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक सुसंगत आणि व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचा विश्वास मंत्री आकाश फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.