Saturday, November 23, 2024
Homeक्राईमरेखा जरे खून खटला : प्रत्यक्षदर्शीचा आरोपींना ओळखण्यास नकार

रेखा जरे खून खटला : प्रत्यक्षदर्शीचा आरोपींना ओळखण्यास नकार

सरकार पक्षाने केले फितूर घोषित

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची हत्या करणार्‍या आरोपींना ओळखण्यास प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजयमाला माने यांनी मंगळवारी न्यायालयीन सुनावणीत नकार दिला. त्यांना सरकार पक्षाने फितूर (होस्टाईल) घोषित केले असून त्यांची उलट तपासणी सुरू केली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने काम पाहणारे सरकारी वकील अनिल ढगे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. माने यांना केवळ या मुद्द्यापुरते फितूर घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे.

- Advertisement -

रेखा जरे यांचा30 नोव्हेम्बर 2020 रोजी सुपारी देऊन खून करण्यात आला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत 26 जणांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या आहेत. मंगळवारी जरे यांच्या खुनाची घटना प्रत्यक्ष पाहणार्‍या तत्कालीन महिला व बालकल्याण अधिकारी माने यांची साक्ष नोंदवण्यात आली. खुनाच्या घटनेच्या वेळी माने या जरे यांच्यासमवेत गाडीत होत्या. त्यामुळे त्यांची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून या खटल्यात महत्वाची साक्ष होती. सरकारी वकील ढगे यांनी घेतलेल्या सरतपासणीत त्यांनी घटनेची माहिती दिली. मात्र, यातील आरोपींना ओळखण्यास नकार दिला. व्हीसीच्या पडद्यावर त्यांना आरोपी दाखवल्यावर या साक्षीदाराने प्रत्यक्ष हत्या करणारे आरोपी यांना ओळखत नाही असे सांगितले.

त्यामुळे या साक्षीदारास सरकार पक्षाने त्या मुद्द्यापुरते फितुर घोषीत केले व त्यांची उलट तपासणी सुरू केली. आता पुढील सुनावणी येत्या 22 नोव्हेंबर रोजी साक्षीदार विजयमाला माने यांची सरकार पक्ष व आरोपी तर्फे उलटपासणी घेण्यासाठी नेमलेली आहे. जरे खून खटला सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांच्या कोर्टात सुरू आहे. आरोपीचे जामीन अर्ज यापूर्वीच सत्र न्यायालयाने व उच्च न्यायालयाने फेटाळलेले असल्याने त्यांना जेलमध्ये राहावे लागत आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. ढगे, मुळ फिर्यादी तर्फे अ‍ॅड. सुरेश लगड काम पाहात आहेत. तर आरोपी तर्फे अ‍ॅड. महेश तवले व अ‍ॅड. परिमल फळे काम पाहात आहेत.

68 जणांचे जबाब
या गुन्ह्याचा संपूर्ण तपास तत्कालीन डीवायएसपी अजित पाटील यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करून 11 आरोपींविरुध्द चार्जशिट न्यायालयात दाखल केले. यामध्ये ज्ञानेश्वर उर्फ गुड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर घोडके, फिरोज राजु शेख, ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, पत्रकार बाळ जगनाथ बोठे, राजशेखर अजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दूल रहेमान अब्दुल आरीफ, महेश तनपुरे व जनार्दन अंकुला चंद्रय्या आदिंचा आरोपीत समावेश असून सदर प्रकरणी तपासी अधिकारी यांनी एकंदरीत 68 साक्षीदारांचे जबाब नोंदविलेले आहे. यामध्ये आरोपी बाळ जगन्नाथ बोठे (पत्रकार) याने सुपारी देऊन रेखा जरे यांचा खुन घडवून आणला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालेले आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या या खटल्यातील आरोपी सध्या सबजेल अहमदनगर येथे बंदिस्त आहे. या खटल्यात आत्तापर्यंत जवळपास 27 साक्षीदार सरकारपक्षातर्फ तपासण्यात आले. यामध्ये खुनाची घटना प्रत्यक्ष पाहणारी साक्षीदार सिंधुबाई सुखदेव वायकर ही जरे यांची मातोश्री आहे व या खटल्यातील त्या फिर्यादी आहेत. या शिवाय घटनास्थळ पंचनाम्यावर नमूद केलेले साक्षीदार शेख मुनीर हसन यांची साक्ष न्यायालयात झाली, गाडी जप्ती, मोबाईल जप्ती व कपडे जप्तीचा पंचनामा देखील या साक्षीदारासमक्ष केलेला होता. मयत रेखा जरे हिचे प्रेताचा पंचनामा साक्षीदार (पंच) नरेंद्र बन्सीभाई पायटन यांचे समक्ष करण्यात आलेला होता व तशी साक्ष या पंचाची न्यायालयात नोंदविलेली आहे. तसेच आरोपी सागर भिंगारदिवे यांचे घर झडतीचा पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपीचे हालचालीचा व कट रचले ठिकाणचा पंचनामाही या साक्षीदाराकडून (पंचाकडून) शाबीत करण्यात आला. या व्यतिरीक्त मन्सुर शेख पंक्चर दुकानवाला (तिसगाव, ता. पाथर्डी), सद्दाम शेख, (रा. तिसगाव), वाजीद पठाण, (चावी तयार करून देणारा, भिंगार), गिरीष रासकर, (रा. माळीवाडा, नगर), निलेश बाळासाहेब सोनवणे, तत्कालीन महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा, सविता नंदकिशोर मोरे, श्रीकांत रामदास गोरडे, नरेंद्र झंकरमल फिरोदिया, पांडुरंग वनदास निमसे व मंगल किसन हजारे आदींची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली आहे. साक्षीदार मंगल किसन हजारे यांची देखील उलट तपासणी आरोपी तर्फे घेण्यात आली असल्याची माहिती मूळ फिर्यादीचे वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या