अहमदनगर (प्रतिनिधी)
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील (Rekha Jare Murder Case) आरोपी बाळ बोठे (Bal Bothe) याने जिल्हा न्यायालयात (District court) दाखल केलेल्या जामीन अर्जावर वकिल महेश तवले यांनी शुक्रवारी युक्तीवाद केला.
दरम्यान काही महत्वाची कागदपत्रे दाखल करण्याकामी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी अॅड. तवले यांनी न्यायालयाकडे केली. यामुळे पुढील सुनावणी मंगळवार, 7 सप्टेंबर रोजी होणार आहे.
बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात 14 जुलै रोजी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. बोठेच्या जामीन अर्जावर याआधी सरकार पक्षाने म्हणणे मांडले आहे. शुक्रवारी बोठेच्या वकिलांनी म्हणणे मांडले. बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता, त्यांचे मैत्रीचे संबंध होते. पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात गुंतविण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोपी सागर भिंगारदिवे याचे नाव बोठे याने हनीट्रॅपच्या चालविलेल्या वृत्त मालिकेत होते. असे असताना बोठे भिंगारदिवेला सुपारी का देईल, असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. न्यायालयासमोर याआधी सरकारपक्षाने बाजू मांडली असून शुक्रवारी आरोपीतर्फे देखील बाजू मांडण्यात आली आहे.