Friday, May 3, 2024
Homeनगरगुन्ह्यातील चाकू जप्त, आरोपीच्या घराची झडती

गुन्ह्यातील चाकू जप्त, आरोपीच्या घराची झडती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्यसूत्रधार बाळ बोठे अद्याप पसार असून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस त्याच्या मागावर आहे. चकवा देऊन पसार झालेला बोठेचा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात पोलिसांनी शोध घेतला. परंतु, पोलिसांना तो अद्याप सापडलेला नाही.

दरम्यान, आरोपींनी जरे यांची हत्या करण्यासाठी धारदार चाकूचा वापर केला होता. तो चाकू आरोपींकडून जप्त केला असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. गुन्ह्यात अटक असलेला आरोपी सागर भिंगारदिवे याच्या घराची झडती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवारात सोमवारी, 30 नोव्हेंबर रोजी रात्री रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून ते सर्व पोलीस कोठडीत आहेत. अटकेतील आरोपींकडून या गुन्ह्याबाबत माहिती काढली जात असून गुन्ह्यातील चाकू जप्त केला आहे.

यापूर्वी सागर भिंगारदिवे याच्याकडून सुपारीची रक्कम 6 लाख 20 हजार रूपये जप्त केले होते. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी त्यादिवशीच जप्त केली आहे. या हत्येतील मुख्य सूत्रधार बोठे पसार झाला आहे. बोठे याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची मिळून पाच पथके रवाना केली आहेत.

जरे यांच्या शवविच्छेदन, अंतिम संस्कार वेळी उपस्थित असलेला बोठे बुधवारी आपले मोबाईल घरात ठेऊन पसार झाला. त्याला अनेकांनी मदत केली असून ते मदत करणारे पोलिसांच्या रडावर आहे. त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती समजली आहे. परंतु, पसार होण्यासाठी वेळ मिळालेल्या बोठे आता पोलिसांना सापडत नसल्याने पोलीस हतबल झाले आहे.

अफवा आणि चर्चा

बाळ बोठे यांचे नाव जरे हत्याकांडाशी जोडले गेल्याने माध्यम क्षेत्रासह राज्यात खळबळ उडाली आहे. जरे याच्या हत्येनंतर बोठे यांचे नाव समोर आल्याने चर्चेला पेव फुटले आहे. यामुळे बोठे याच्या पसार होण्यापासून, त्याला मदत करणारे, अटक कधी होईल, काय खुलासे होईल, जरे यांच्या हत्येची सुपारी बोठे याने का दिली. अशा वेगवेगळ्या चर्चा गेल्या तीन ते चार दिवसांपासून झडत आहेत. चर्चेमध्ये काही अफवा पसरविल्या जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस दलाने सावध पवित्रा घेतला असून तपासाबाबत कमालीची गोपनियता बाळगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या