अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रेखा जरे खून खटल्यातील साक्षीदाराला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना नोटीस जारी केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर राहावे लागेल, अशी माहिती या खटल्यातील मूळ फिर्यादीच्यावतीने काम पाहणारे वकील अॅड. सुरेश लगड यांनी दिली.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी सध्या जिल्हा न्यायालयात रोज सुरू आहे. पोलीस अधीक्षकांच्या नोटीसीबाबत माहिती देताना अॅड. लगड म्हणाले, रेखा जरे खून खटल्यात डॉ. विजय मकासरे हे सरकार पक्षाचे साक्षीदार आहेत. त्यांची सरतपासणी झाली असून, उलटतपासणी बाकी आहे. डॉ. मकासरे यांना संशयित आरोपींच्या नातेवाईकांकडून धमक्या येत आहेत.
याबाबत डॉ. मकासरे यांनी न्यायालयाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यामुळे न्यायालयाने त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मात्र, या आदेशाची माहिती पोलिसांना देऊनही व पाच-सहा दिवस वाट पाहूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांना नोटीस जारी केल्याचे अॅड. लगड यांनी सांगितले.