Saturday, May 4, 2024
Homeनगररेखा जरे हत्याकांड : श्रीरामपूर, राहुरी, राहात्यातील तिघे जेरबंद

रेखा जरे हत्याकांड : श्रीरामपूर, राहुरी, राहात्यातील तिघे जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

- Advertisement -

फिरोज राजू शेख (वय 26 रा. संक्रापूर, आंबी ,ता. राहुरी), ज्ञानेश्वर ऊर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (वय 24 रा. कडीत- फत्त्याबाद, ता. श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (वय 25 रा. तिसगाव फाटा, ता. राहाता) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना बुधवारी पारनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगावच्या (ता. पारनेर) घाटात सोमवारी रात्री जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. मारेकर्‍यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. मंगळवारी विविध ठिकाणांहून तीन आरोपींना अटक करण्यात आली.

जरे यांची हत्या सुपारी देऊनच केली असल्याची माहिती समोर आली आहे. हत्येच्यावेळी वापरलेल्या दुचाकीचा नंबर, मारेकर्‍यांचा फोटो, घटनास्थळावरून केलेले फोन यामुळे पोलिसांनी वेगवान तपास करत 24 तासांत घटनेचा उलगडा केला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी वाळू व्यवसायाशी संबंधित आहेत.

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गोपनीयता बाळगली असून लवकरच सर्व सत्य समोर येईल असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जरे यांच्या हत्याकांडाचा तपास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

पाटील यांनीच बुधवारी आरोपींना पारनेर न्यायालयात हजर केले. हत्येमागे कोण आहे याचा शोध घेणे बाकी आहे. हत्यार कुठून घेतले, हत्येचा कट कुठे रचला गेला याचा तपास करणे बाकी असल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाच्यावतीने करण्यात आला. सरकारी पक्षाकडून आरोपींच्या दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती़ न्यायालयाने तिघांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़.

रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हत्या झाल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली. या गुन्ह्यात तीन आरोपींना पुराव्यानिशी अटक करण्यात आली आहे. तर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे. वाहन व्यवस्थित चालवित नसल्याने हत्या झाली हा फक्त बनाव आहे. हत्येमागे वेगळे कारण असून तपास सुरू आहे.

-मनोज पाटील, पोलीस अधीक्षक.

आणखी दोघे संशयित ताब्यात

हत्याकांडात मंगळवारी तीन आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी बुधवारी चौथा आरोपी भिंगारदिवे याला ताब्यात घेतले आहे. त्याने हत्येची सुपारी देण्यासाठी मध्यस्थी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भिंगारदिवे याला अटक केल्याने हत्या कशासाठी केली? सुपारी कोणी दिली? याची माहिती पोलीस तपासात समोर येणार आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. लवकरच हत्येमागील सत्य समोर येईल असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अजून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मास्टर माईंडचा सातबारा पोलिसांकडे

या हत्याकांडाचा तपास प्रगतिपथावर असून ही हत्या कोणी घडून आणली, यामागचा मास्टर माईंड आणि त्याचा सातबारा पोलिसांनी जमा केला आहे. जरे यांच्यासोबत झालेले संभाषण व इतर गोष्टी पोलीस तपासात समोर आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी याबाबत गोपनीयता बाळगली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या