Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील १८६ कैद्यांची स्वातंत्र्यदिनी मुक्तता

राज्यातील १८६ कैद्यांची स्वातंत्र्यदिनी मुक्तता

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यंदाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी राज्यातील विविध तुरुंगातील निम्म्याहून अधिक शिक्षा भोगलेल्या तब्बल १८६ कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे किरकोळ गुन्ह्यांखाली विविध तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षभरात तीन टप्प्यांत शिक्षेत देण्यात आलेल्या विशेष माफीमुळे ५८१ कैद्यांना कारागृहातून सोडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरातील विविध तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची शिक्षा काही निकषांच्या आधारे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निम्म्याहून अधिक शिक्षा भोगलेल्या, तुरुंगातील चांगली वर्तणूक आणि इतर निकषांनुसार पात्र कैद्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे विशेष माफी देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार अमृतमहोत्सवी वर्षाच्या पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६, दुसऱ्या टप्प्यात म्हणजे यावर्षी २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैद्यांना विशेष माफी देऊन तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. आता तिसऱ्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण १८६ कैद्यांना सोडण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यासंदर्भातील आदेश राज्यातील सर्व कारागृहांना १ ऑगस्ट रोजी देण्यात आले आहेत. माफी देण्यात आलेल्यांमध्ये नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील ३४, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील २३, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातील २४, अमरावती खुले कारागृहातील १९, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहातील १३ कैद्यांचा समावेश आहे.

तुरुंगातील शिस्त आणि चांगली वर्तणूक ठेवणाऱ्या कैद्यांची सुटका करून त्यांनी गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना ही संधी दिली जाते. मात्र, मृत्यूदंडाची शिक्षा झालेले, खून, बलात्कार, दहशतवादी, भ्रष्टाचार, मोक्का आदी गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेले तसेच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची शिक्षा माफ केली जात नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या